सांगली: पडक्या खोलीत गांजाची लागवड; खंडनाळात ६६ हजाराचा गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 12:13 PM2022-10-26T12:13:54+5:302022-10-26T12:14:17+5:30
याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली
गजानन पाटील
दरीबडची : खंडनाळ (ता. जत) येथील हरीबा आप्पा कुलाळ (वय-७२, रा.कुलाळवाडी) यांच्या पडक्या खोलीमध्ये छापा टाकून ६६ हजार ५२० रुपयांचा ६ किलो ६५२ ग्रॅम ओला गांजा उमदी पोलिसांनी पकडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली. ही कारवाई काल, मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, हरीबा कुलाळ हे कुटुंबासमवेत कुलाळवाडी-खंडनाळ येथे राहतात. घराच्या पुर्वेस जुने घर आहे. तेथील पडक्या खोलीमध्ये गांजाची लागवड केली होती. उमदी पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. यामाहितीवरुन उमदी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने त्याच्या घरावर धाड टाकली. यावेळी १२ लहान मोठी गांजाची झाडे आढळून आलीत. हा गांजा ६६ हजार ५२० रुपये किंमतीचा आहे.
याप्रकरणी बेकायदा बिगर परवाना मानवी मनावर व मेंदूवर परिणाम करणारे अंमली पदार्थानुसार अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादी पोलीस नाईक आर. एस. बन्नेनवार यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन पलूस्कर, आप्पा घोडके, सचिन हक्के, सचिन मासाळ यांनी कारवाई केली.