उमराह यात्रेच्या आमिषाने १८० भाविकांना ४५ लाखांचा गंडा-: सांगली, कोल्हापूर, पुण्यातील भाविकांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:47 AM2019-02-05T00:47:49+5:302019-02-05T00:48:57+5:30
सौदी अरेबियातील उमराह यात्रा घडवून आणण्याचे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील १८० भाविकांना सुमारे ४५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस
सांगली : सौदी अरेबियातील उमराह यात्रा घडवून आणण्याचे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील १८० भाविकांना सुमारे ४५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी भिवंडी (जि. ठाणे) येथील सख्ख्या भावांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमजान खान व मुस्ताक खान (रा. जवार हॉटेलजवळ, भिवंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. खान यांची ‘रमजान’ टुरिस्ट नावाने कंपनी आहे. या कंपनीमार्फत सौदी अरेबियातील उमराह यात्रा घडवून आणण्याचे त्यांनी आमिष दाखविले. यासाठी त्यांनी सांगलीत दिलावर सिकंदर शेख (रा. बुधगाव, ता. मिरज) व कोल्हापूर जिल्ह्यात शादाब बडेखान नदाफ (इचलकरंजी) यांना भाविक जमा करण्यासाठी एजन्सी दिली होती. शेख व नदाफ भाविकांशी संपर्क साधून यात्रेला जाण्याचे आवाहन केले. पंधरा दिवसांतून ही यात्रा असते. खान यांनी जानेवारी २०१९ मध्ये यात्रेला जाण्यासाठी सौैदी अरेबिया या देशाचा व्हिसा व मुंबई ते सौदी अरेबिया विमान प्रवासाचे तिकीट देण्याचे आमिष दाखविले होते.
दिलावर शेख व शादाब नदाफ यांनी ५ फेब्रुवारी २०१८ पासून भाविकांशी संपर्क साधून यात्रेसाठी पैसे जमा करण्यास सुरुवात केली होती. डिसेंबरअखेर त्यांनी सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील १८० भाविक जमा केले. त्यांच्याकडून प्रत्येकी २६ हजारापासून ते ३८ हजारपर्यंत रक्कम जमा करून घेतली. सुमारे ४५ लाख आठ हजार रुपयांची रक्कम त्यांनी गोळा केली होती. ही सर्व रक्कम त्यांनी अॅक्सिस बँकेच्या सांगलीतील आझाद चौक शाखेत मुस्ताक खान याच्या खात्यावर जमा केली होती. १७ जानेवारी २०१९ पर्यंत जशी रक्कम गोळा होईल, त्याप्रमाणे शेख व नदाफ यांनी खानच्या खात्यावर जमा केले होते.
जानेवारीची ३१ तारीख आली तरी खान बंधूंनी भाविकांना यात्रेला नेण्यासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत. शेख व नदाफ यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. पण ते टाळाटाळ करू लागले. गेल्या चार दिवसांपासून शेख हे खान यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होते. पण तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच शेख यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे तक्रार केली. शर्मा यांनी सांगली शहर पोलिसांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी रमजान खान व समशेर खान यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
बँक खाते गोठविण्यासाठी पत्र
संशयित रमजान व समशेर खान यांचे अॅक्सिस बँकेतील खाते गोठविण्यात यावे, असे पत्र पोलिसांनी बँक व्यवस्थापनास दिले आहे. खान यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सोमवारी रात्री भिवंडीला रवाना झाले आहे. तेथील पोलिसांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेतले जाणार आहे. राज्यातील आणखी काही जिल्ह्यातील भाविकांना खान यांनी गंडा घातला असण्याची शक्यता आहे. पोलीस उपनिरीक्षक समीर चव्हाण तपास करीत आहेत.