सांगलीत ७५ लाखांची बेहिशेबी रोकड जप्त, आटपाडीचे तिघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:32 PM2022-05-11T12:32:26+5:302022-05-11T12:32:49+5:30
सांगली : सांगली शहर पोलिसांनी मारुती चाैक परिसरात माेटारीतून ७५ लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. याप्रकरणी आकाश नारायण ...
सांगली : सांगली शहर पोलिसांनी मारुती चाैक परिसरात माेटारीतून ७५ लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. याप्रकरणी आकाश नारायण केंगार (वय २७, रा. अंबानगर, आटपाडी), महेंद्र लक्ष्मण जावीर (वय २६) आणि सुनील शहाजी कदम (वय ३५, दोघेही रा. कौठुळी, रा. आटपाडी) या तिघांना माेटारीसह ताब्यात घेतले. सोमवारी (दि. ९) रात्री ही कारवाई करण्यात आली.
कर्नाटकातील माेटारीतुन (केए ५५ एम ८०३७) बेकायदा रोकड वाहतूक केली जाणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सांगलीतील मारुती चाैक परिसरात संशयास्पद माेटार अडवली. माेटारीची तपासणी केली असता एका बॅगेत ७५ लाख रुपयांची रोकड आढळून आली. ती कोणाची आहे किंवा कोणत्या कामासाठी बाळगली आहे, याचा समाधानकारक खुलासा तिघेही करू शकले नाहीत, त्यामुळे पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. रोकड व माेटार असा ८१ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी याबाबतची माहिती दिली.
उपाधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सिंदकर, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, विनायक शिंदे, गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, झाकीरहुसेन काझी, दीपक कांबळे, अक्षय कांबळे, विक्रम खोत, अभिजित माळकर आदींनी कारवाईत भाग घेतला.