महापालिका हद्दीत विनापरवाना ३५ बेकरी उत्पादक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2016 11:37 PM2016-04-05T23:37:16+5:302016-04-06T00:16:36+5:30
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : सुनील आंबोळे यांच्या निलंबनाची नगरसेवक युवराज गायकवाड यांची मागणी
सांगली : महापालिका क्षेत्रात ३० ते ३५ बेकरी उत्पादक विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. या उत्पादकांकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगीच घेतली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. तरीही आरोग्य विभागाकडून बेकरी उत्पादकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. यामागे मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप नगरसेवक युवराज गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केला.
याप्रकरणी आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांना निलंबित करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
शहरात दोन महिन्यांपूर्वी नव्यानेच सुरू झालेल्या एका बेकरीबाबत गायकवाड यांनी प्रशासनाकडू माहिती मागविली होती. त्यात या बेकरीला परवानगी नसल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली. पण अजूनही आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. अशातच आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीद्वारे महापालिका हद्दीत ३० ते ३५ बेकरी उत्पादक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. या बेकरी उत्पादकांकडून ७० ते ८० विक्रेते माल खरेदी करून व्यवसाय करतात. त्यांनीही महापालिकेची परवानगी घेतलेली नाही.
याबाबत गायकवाड म्हणाले की, बेकरी उत्पादक व विक्रेत्यांनी परवाना न घेताच व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बेकरी व्यावसायिकांंनी घरपट्टी व पाणीपट्टीचा करही बुडविला आहे. त्यातून पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांना घरपट्टी व पाणीपट्टी व्यावसायिक दराने लागू करण्याची गरज आहे. त्यांनी पालिकेची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी दाखल करून कराची वसुली करावी, यासाठी आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेणार आहोत. केवळ आरोग्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या दालनासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
वकिलांच्या अभिप्रायाला केराची टोपली
एका बेकरीवरील कारवाईसंदर्भात आरोग्य विभागाने महापालिकेच्या कायदा सल्लागारांचा अभिप्राय मागविला होता. कायदा सल्लागारांनी विनापरवाना बेकरी व्यवसाय करणे चुकीचे असून, अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करून बेकरी बंद करण्याची सूचना केली होती. पण या अभिप्रायालाही आरोग्याधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला.