सार्वजनिक बांधकाम विभागाचेच विनापरवाना बांधकाम, सांगली महापालिकेची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:12 PM2024-02-22T12:12:09+5:302024-02-22T12:12:26+5:30
सांगली : मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या कार्यालयाच्या तळमजल्याचे बांधकाम विनापरवाना केल्याची बाब समोर आली असून, महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना ...
सांगली : मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या कार्यालयाच्या तळमजल्याचे बांधकाम विनापरवाना केल्याची बाब समोर आली असून, महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना बांधकामाबाबतची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते संभाजी सावंत यांनी याबाबत तक्रार केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिरज किल्ला भाग परिसरात कार्यालयाचे तळमजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. बांधकामाचा परवाना, मंजुरीचा नकाशा, मूळ मिळकत उतारा, मूळ मोजणी नकाशा, महापालिकेची घरपट्टी भरल्याची नोंद आदी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागास दिले होते. त्यांनी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. महापालिकेने ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी संबंधित बांधकामाचे मोजमाप नोंदविले होते. मोजमापाच्या आधारे नोटीस बजावली होती.
पंधरा दिवसांच्या मुदतीत या विभागाने कागदपत्रे सादर न केल्याने महापालिकेचे मिरजेतील नगररचनाकार राजेंद्र काकडे यांनी आणखी एक नोटी देऊन आठ दिवसांत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. ही कागदपत्रे सादर न झाल्यास विनापरवाना बांधकामावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.