आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता

By admin | Published: April 22, 2016 11:05 PM2016-04-22T23:05:59+5:302016-04-23T01:00:06+5:30

बी. जी. कोळसे-पाटील : आंबेडकर जयंतीनिमित्त कास्ट्राईब संघटनेकडून जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

Uncertainty in the country due to poisonous ideology of RSS | आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता

आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता

Next

सांगली : जगातील कष्टकरी जनतेच्या उध्दारासाठी कार्य करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडला होता. देशाचा अन्नदाता असलेल्या जनतेचे शोषण करुन आपला उध्दार साधणाऱ्या प्रवृत्तीचे आता राज्य आल्याने, कष्टकरी जनतेच्या पिळवणुकीत वाढच होत असून आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता निर्माण झाल्याचे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी शुक्रवारी केले.
जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात जिल्हा परिषद प्रशासन, बार्टी, पुणे आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘कामगार संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शोषणातून मुक्तता हा राज्यघटनेचा उद्देश फक्त आणि फक्त आंबेडकरांच्यामुळे सफल झाला आहे. जगातील कोणत्याच राज्यघटनेत याचा उल्लेख नसल्याने जगभरातील शोषितांच्या उध्दारासाठी त्यांनी कार्य केले. मात्र, सध्या आरएसएसमुक्त भारताची घोषणा करत असताना देशातील अस्वस्थ परिस्थिती प्रकर्षाने जाणवते. आरएसएसने आपल्या विषारी विचारसरणीचा खुबीने वापर केल्याने देशात विचारांची लढाई करण्याची वेळ आहे. आरएसएसच्या या विचारसरणीला प्रत्युत्तर देण्यासाठी आंबेडकरांचे विचार उपयोगी पडणार आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, देशातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था अधिक प्रबळ करण्यासाठी नेहमीच गोळवलकर, टिळक आणि सावरकरांचे विषारी विचारच कारणीभूत ठरले आहेत. इतिहासाकडे चिकित्सक पध्दतीने पाहिल्यास, वास्तवावर आधारित इतिहासाचे पुनर्लेखन करणे आवश्यक बनले आहे. समाजात निर्माण झालेल्या दु:खाचे मूळ विषारी विचारसरणीत असल्याने या विचारसरणीला झिडकारले पाहिजे. आंबेडकरांचे विचार समाजात रुजविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करायला हवेत, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी रघुनाथ भोसले, डॉ. बाबूराव गुरव, गणेश मडावी, बाजीराव प्रज्ञावंत, विजय सातपुते, मनोज बनकर, संतोष कदम, नरेंद्र खांडेकर, विकास देवके, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आंबेडकर समजूच दिले नाहीत
देशातीलच नव्हे, तर जगभरातील कष्टकरी मानवजातीच्या कल्याणासाठी आंबेडकरांचे कार्य प्रेरणादायी ठरते. मात्र, भांडवलदारांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या लोकांना आंबेडकरांचे हे महान कार्य कळतच नाही, त्यांना कळूही दिले जात नाही, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले.

Web Title: Uncertainty in the country due to poisonous ideology of RSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.