खरेदीदारांच्या भूमिकेने मार्केटमध्ये अस्वस्थता

By admin | Published: July 16, 2016 11:16 PM2016-07-16T23:16:57+5:302016-07-16T23:34:41+5:30

भाजीपाला व्यवहार सुरळीत : हळद, गूळ सौदे बंदच

Uncertainty in the market by buyer's role | खरेदीदारांच्या भूमिकेने मार्केटमध्ये अस्वस्थता

खरेदीदारांच्या भूमिकेने मार्केटमध्ये अस्वस्थता

Next

सांगली : नियमनमुक्तीच्या विरोधात गेल्या आठवड्याभरापासून येथील बाजार समिती व फळे, भाजीपाला मार्केटमध्ये असलेले अस्थिरतेचे वातावरण कायम आहे. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर कांदा, लसूणसह इतर व्यवहार सुरळीत झाले असले तरी, फळे खरेदी करण्यास खरेदीदारांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, खरेदीदारांचे याबाबतचे गैरसमज दूर करण्यात आले असून, आता व्यवहार सुरळीत होतील, असा आशावाद फळे व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाने बाजार समितीसाठी नियमनमुक्तीचा अध्यादेश काढल्यापासून व्यापारी वर्गात गैरसमज निर्माण झाले होते. त्यात बहुतांश बाजार समित्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर सांगलीतही फळ मार्केटमध्ये बंद पाळण्यात आला होता. मात्र, यावर सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर कांदा, बटाटा व्यापारी असोसिएशनने व्यवहार सुरळीत चालू केले होते. फळे व भाजीपाला मार्केटमधील भाजीपाला व्यवहार सुरळीत चालू असतानाच गेल्या दोन दिवसापासून फळांच्या व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यास खरेदीदारांनी नकार दर्शवला होता. या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यापासून पुन्हा बंद आंदोलन करण्याचा आग्रह करण्यात येत होता. मात्र, नियमनमुक्तीचा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, यापूर्वीच इतर राज्यांनी स्वीकार केल्याने याबाबत मतभेदाचे कारण नसल्याचे स्पष्टीकरण फळे व्यापारी संघटनेकडून देण्यात येत होते.
शनिवारी सकाळीही याबाबत खरेदीदारांनी माल खरेदी करण्यास नकार दर्शवला. यावर तातडीने बैठक घेत नियमनमुक्ती निर्णयाचा सर्वत्र अवलंब झाल्याने आपला विरोध चुकीचा असून, तरीही काही अडचणी असल्यास चर्चेतून तोडगा काढूया, पण खरेदी थांबविण्यात येऊ नये, असे आवाहन केले. शनिवारी मार्केटमध्ये डाळिंब, पपई, सीताफळाची आवक झाली होती. (प्रतिनिधी)

सोमवारी तोडगा अपेक्षित
फळे व भाजीपाला मार्केटमधील व्यवहार काहीअंशी सुरळीत झाले असले तरी, बाजार समितीतील हळद, गुळासह बेदाण्याचे सौदे अकरा दिवसांपासून बंद आहेत. तर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतीमालाची होणारी आवक अत्यल्प असल्याने त्याचा परिणाम होणार नसून शेतकऱ्यांना नुकसान पोहोचत असेल तर व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा बाजार समितीने दिला आहे. दरम्यान, या बंदमुळे दैनंदिन दोन कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. यावर सोमवारी तोडगा निघणे अपेक्षित आहे.


व्यवहार सुरळीत झाले असले तरी खरेदीदारांकडून नकार येत होता. यावर शनिवारी व्यापारी, खरेदीदारांची बैठक घेत त्यांना शासनाच्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांकडून कोणाचीही अडवणूक होणार नाही. खरेदीदारांच्या शंकांचे निरसन करण्यात आले असून, आता फळांचे व्यवहार सुरळीत होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
- शिवाजी प्रभू सगरे, अध्यक्ष,
फू्रट असोसिएशन, सांगली.

Web Title: Uncertainty in the market by buyer's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.