साकेत कांबळेचा शिरविरहित मृतदेह कणेगावजवळ सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:46 AM2018-11-27T00:46:44+5:302018-11-27T00:46:53+5:30
इस्लामपूर : येथील बांधकाम सुपरवायझर साकेत किरण कांबळे (वय ३२) याचे शिर आणि एक हात नसलेले धड तब्बल दहा ...
इस्लामपूर : येथील बांधकाम सुपरवायझर साकेत किरण कांबळे (वय ३२) याचे शिर आणि एक हात नसलेले धड तब्बल दहा दिवसांनी सोमवारी सकाळी कणेगावच्या जुन्या पुलाजवळ मिळून आले, तर चिकुर्डे पुलाजवळून गुन्ह्यात वापरलेली धारदार पारळीही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. सांगली महापालिकेच्या दोन यांत्रिक बोटी आणि कोल्हापूर येथील जीवरक्षक दलाच्या मदतीने ही शोधमोहीम राबविण्यात आली. डीएनए चाचणीसाठी साकेतच्या शरीराचे नमुने घेण्यात आले आहेत.
आर्थिक देवघेवीच्या कारणातून मुख्य संशयित संतोष ज्ञानू पवार व त्याचा सहकारी अनिकेत गणेश पानिरे या दोघांनी १७ नोव्हेंबरच्या रात्री साकेत कांबळे याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे शिर आणि एक हात धडावेगळा केला. गुन्ह्यात वापरलेले लोखंडी रॉड आणि धारदार पारळी या शस्त्रांसह शीर आणि हात चिकुर्डेच्या पुलावरुन वारणा नदीच्या पाण्यात टाकला, तर धड कणेगावजवळील पुलावरुन पाण्यात टाकण्यात आले होते.
या घटनेचा उलगडा झाल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किशोर काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या ३ दिवसांपासून अथकपरिश्रम घेत शोधमोहीम राबविली. रविवारी लोखंडी रॉड मिळाला, तर सोमवारी त्याचे शिरविरहीत धड आणि पारळी मिळून आली. ही घटना समजताच साकेतच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे सर्वांनाच शोक अनावर झाला होता.
साकेतच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर जाग्यावरच उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा मृतदेह साकेतच्या कुटुंबियांनी स्वीकारला. डीएनए चाचणीसाठी त्याच्या शरीराचे नमुने घेण्यात आले आहेत. या शोधमोहिमेत सांगली महापालिकेच्या दोन यांत्रिक बोटी आणि कोल्हापूरच्या जीवसंरक्षक दलातील दिनकर देसाई व त्यांच्या सहकाºयांनी भाग घेतला. इस्लामपूर व कुरळप पोलिसांची पथकेही या शोधमोहिमेत सहभागी झाली होती. पोलीस उपअधीक्षक किशोर काळे अधिक तपास करत आहेत.