भाच्याच्या रकमेवर डल्ला मारून मामाचा चोरीचा बनाव
By घनशाम नवाथे | Published: July 28, 2024 10:30 PM2024-07-28T22:30:14+5:302024-07-28T22:30:50+5:30
वांगीतील गुन्ह्याचा छडा; गुन्हे अन्वेषणकडून १० लाख ६० हजाराची रोकड जप्त
घनशाम नवाथे/ लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भाच्याने ठेवायला दिलेली रक्कम थोडी खर्च केल्यानंतर उर्वरीत रक्कम हडप करण्यासाठी मामाने चोरीचा बनाव केला. परंतू स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मामाचा भांडाफोड केला. याप्रकरणी संशयित किरण सिताराम कुंभार (वय ४२, रा. सुतार मळा, वांगी, ता. कडेगाव) याला अटक केली. त्याच्याकडून १० लाख ६० हजार रूपये जप्त केले.
अधिक माहिती अशी, वांगी येथील किरण कुंभार यांच्या भाच्याने रोख रक्कम थोडे दिवस म्हणून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे दिली होती. परंतू मामा किरणला पैशाची हाव सुटली. त्याने काही रक्कम स्वत:साठी खर्च केली होती. खर्च केलेली रक्कम भाच्याला द्यायला लागू नये तसेच इतर रक्कम स्वत:ला वापरायला मिळावी यासाठी किरणने घरातच रक्कम लपवून ठेवली. त्यानंतर त्याने स्वत:च्या कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून चोरी झाल्याचा बनाव तयार केला. त्यानंतर वांगी पोलिस ठाण्यात घरफोडी झाल्याची फिर्याद दिली. १५ लाख २० हजार रूपये रक्कम चोरी झाल्याची स्वत:च फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
वांगी पोलिस चोरीचा तपास करत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकास चोरीस गेलेली रक्कम फिर्यादी किरण कुंभार यानेच लपवून ठेवून चोरीचा बनाव रचल्याची माहती मिळाली. त्यानुसार किरणला ताब्यात घेऊन सखोल तपास केला. तेव्हा त्याने चोरीची कबुली दिली. तसेच लपवून ठेवलेले १० लाख ६० हजार पोलिसांना काढून दिले. किरणला मुद्देमालासह चिंचणी-वांगी पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक सावंत, पंकज पवार, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, कर्मचारी सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरूण पाटील, श्रीधर बागडी, अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, सूरज थोरात, रोहन घस्ते यांच्या पथकाने कारवाई केली.