शासनाच्या मदतीशिवाय चिंचोलीत काष्ठशिल्पांचे अनोखे संग्रहालय-: अशोक जाधव यांचा उपक्रम-जागतिक संग्रहालय दिन विशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:04 PM2019-05-17T23:04:17+5:302019-05-17T23:07:36+5:30
संग्रहालये म्हटली की, ती फक्त शहरातच पाहायला मिळतात. परंतु चिंचोली (ता. शिराळा) या खेडेगावात शासनाच्या मदतीशिवाय शहरी संग्रहालयाला लाजवेल असे संग्रहालय चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी साकारले
गंगाराम पाटील ।
वारणावती : संग्रहालये म्हटली की, ती फक्त शहरातच पाहायला मिळतात. परंतु चिंचोली (ता. शिराळा) या खेडेगावात शासनाच्या मदतीशिवाय शहरी संग्रहालयाला लाजवेल असे संग्रहालय चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी साकारले आहे.
दि. १८ रोजी जागतिक संग्रहालय दिन साजरा होत आहे, या पार्श्वभूमीवर जाधव यांनी साकारलेल्या संग्रहालयाचा घेतलेला आढावा. या त्यांच्या संग्रहालयात पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानावरील साकारलेले अप्रतिम व्यक्तिचित्र, कृत्रिमतेची जोड न देता साकारलेली नैसर्गिक आविष्काराची अफलातून काष्ठशिल्पे, जुन्या दुर्मिळ लाकडी वस्तूंचा संग्रह, देश-परदेशातील काड्यापेट्यांचा भन्नाट संग्रह, जगातील अनेक संग्रहालयांची माहिती, भारतीय व पाश्चिमात्य चित्रकार, शिल्पकार यांच्या माहितींची उपयुक्त कात्रणे, चित्रकलेविषयी माहितीची पुस्तके, सहा शास्त्रीय नृत्यांच्या वेगवेगळ्या भावमुद्रांची छायाचित्रे, अनेक कवितासंग्रह, कादंबऱ्या व इतर पुस्तकांचा खजाना, जागतिक कीर्तीच्या भारतीय संपदांची छायाचित्रे, दिल्ली येथील प्रसिद्ध वास्तुकलेची छायाचित्रे, मध्य प्रदेशातील २४ महालांची छायाचित्रे, पारंपरिक खेळण्यांची छायाचित्रे, लोककलांची छायाचित्रे यांचा सामवेश आहे. या साºया वैविध्यपूर्ण खजान्याची पर्वणी महाराष्ट्रातील चिंचोलीसारख्या एका खेडेगावात विनाशुल्क कलाप्रेमींना पाहता येईल.
केवळ आजच संधी
हे सर्व प्रकारचे संग्रह आजच्या दिवशीच पाहायला ठेवण्यात आले आहेत. जागेअभावी पुन्हा एकाचवेळी हे सर्व पाहायला मिळणार नाही. याची कृपया कलारसिकांनी नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.