खानापूरमध्ये शिवसेनेत अंतर्गत संघर्ष

By Admin | Published: July 19, 2015 11:15 PM2015-07-19T23:15:19+5:302015-07-19T23:43:28+5:30

जुन्या-नव्या गटात ठिणगी : आमदारांनी जुन्या शिवसैनिकांना दाखविला ‘कात्रजचा घाट’

Under the Shiv Sena internal struggle in Khanapur | खानापूरमध्ये शिवसेनेत अंतर्गत संघर्ष

खानापूरमध्ये शिवसेनेत अंतर्गत संघर्ष

googlenewsNext

दिलीप मोहिते - विटा -गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना पक्षात प्रवेश केलेले खानापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी जुन्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ‘कात्रजचा घाट’ दाखविल्याने, शिवसेनेत आता जुना व नवा गट कार्यरत झाला आहे. खानापूर तालुकाप्रमुख संजय विभुते व कडेगावचे तालुकाप्रमुख सुभाष मोहिते यांनी, आमदारांनी जुन्या शिवसैनिकांना डावलल्याची नाराजी व्यक्त करीत आ. बाबर यांच्या कार्यपध्दतीबाबत वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, खानापुरात आता शिवसेनेच्या जुन्या व नव्या गटाच्या संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.
खानापूर मतदारसंघातील तत्कालीन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अनिल बाबर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षात प्रवेश करून उमेदवारी घेत आमदारपदी संधी मिळविली. मात्र, मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वाईट काळात ज्यांनी पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या शिवसेनेच्या जुन्या पदाधिकारी व शिवसैनिकांना आ. बाबर यांनी निवडून आल्यापासून अलिप्त ठेवले असल्याची तक्रार जुन्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. खानापूर तालुकाप्रमुख संजय विभुते यांनी विटा येथे दि. २५ एप्रिल रोजी संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या उपस्थितीत घेतलेल्या सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बानुगडे-पाटील यांच्यासमोरच आ. बाबर यांच्यावर विभुते यांनी हल्ला चढवित त्यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
एवढेच नव्हे, तर या मेळाव्याला आ. बाबर समर्थक एकही कार्यकर्ता हजर नव्हता. त्यामुळे आ. बाबर हे मतदारसंघात पक्षवाढीसाठी काहीही काम करीत नसल्याची तक्रार विभुते यांनी भर मेळाव्यात केली होती. तेव्हापासून खानापूर तालुका शिवसेनेत खऱ्याअर्थाने संघर्षाची ठिगणी पडल्याचे दिसून आले. आटपाडी तालुक्यातही काही गावात शिवसेनेच्या शाखा सुरू करण्यात आल्या. परंतु, त्याठिकाणीही आ. बाबर समर्थक नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पक्षाचे आमदार असून, अडचण, नसून खोळंबा असल्याचे वक्तव्य विभुते यांनी मेळाव्यात केले होते. सध्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे आ. बाबर यांनी कॉँग्रेसचे मोहनराव कदम, भाजपचे माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांच्याशी युती केली. त्यावेळी खानापूर तालुकाप्रमुख संजय विभुते व कडेगाव तालुकाप्रमुख सुभाष मोहिते यांना आ. बाबर यांनी विचारात घेतले नाही. त्यामुळे त्यांनी थेट राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या महायुतीशी हातमिळवणी केली. परंतु, ही हातमिळवणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंतच टिकून राहिली.
कारण, पक्ष आदेशानुसार विभुते व मोहिते यांच्यावर बाजार समितीच्या समर्थक उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची वेळ आली. त्याचदिवशी आ. बाबर यांच्याविरोधात पत्रक काढून पक्षाच्या आमदारांना (अनिल बाबर) जुन्या पदाधिकारी व शिवसैनिकांविषयी आस्था नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या निवडणुकीबाबतचा सर्व अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे विभुते व मोहिते यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जुन्या गटाला आ. बाबर यांनी कोणत्याही प्रकारे विचारात न घेतल्याने आता शिवसेना पक्षात जुना व नवा गट या वादाच्या संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा उपप्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख म्हणून विट्याचे शिवाजी शिंदे काम पाहत आहेत. विद्यमान आ. अनिल बाबर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावेळी त्यांनी केलेले काम शिवसेनेसाठी महत्त्वपूर्ण समजले जाते. विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाचे उमेदवार आ. बाबर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली होती. सध्या शिवसेनेत आता जुन्या व नव्या गटाचा वाद उफाळून येत असताना, जिल्हा उपप्रमुख शिंदे यांची भूमिका काय? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परंतु, शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, आ. बाबर हे पक्षाचे आमदार असून, त्यांच्या नेतृत्वाखालीच सर्वांना काम करावे लागेल. पक्षात जुना व नवा गट वाद खपवून घेतला जाणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Under the Shiv Sena internal struggle in Khanapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.