मुख्यमंत्र्यांच्या विक्रमानंतर शिक्षणमंत्री सरसावले, 'मॅसेज'साठी पालकांना मोबाइलसमोर बसवले
By संतोष भिसे | Published: March 5, 2024 01:47 PM2024-03-05T13:47:33+5:302024-03-05T13:49:14+5:30
महावाचन चळवळीचे फर्मान, प्रत्येक मूल वाचू लागेल अशी अपेक्षा
संतोष भिसे
सांगली : पालक अभिप्रायाच्या सेल्फींच्या ऑनलाइन विक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात विद्यार्थी व पालकांना कसरत करायला लावली. त्याचे ओझे शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांच्या खांद्यावरून उतरण्यापूर्वीच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या महावाचन चळवळीचे फर्मान निघाले. रविवारी (दि. ३) राज्यभरातील लाखो पालक आणि विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा संदेश ऐकत मोबाइलसमोर बसावे लागले.
केसरकर यांनी रविवारी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला. ‘चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!’ या थीमखाली महावाचन चळवळ राबविली. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेंतर्गत हा उपक्रम ऐच्छिक होता; पण शिक्षण विभागाने तो अप्रत्यक्षरीत्या सक्तीने राबविला. त्यामुळे रविवारची सुटी एन्जॉय करण्याऐवजी पालक व विद्यार्थ्यांना सक्तीने मोबाइलसमोर यू-ट्यूब पाहत बसावे लागले. कार्यक्रम १०:५० ते ११:१५ या वेळेत झाला. थेट प्रक्षेपणादरम्यान कोणालाही लेफ्ट होण्याची परवानगी नव्हती.
‘संबंधित प्रत्येक घटकाने मंत्र्यांचा संदेश वेगवेगळ्या मोबाइलवर पूर्ण वेळ पाहायचा आहे. यू-ट्यूब लिंकवर वेळेपूर्वी १० मिनिटे जॉइन व्हायचे आहे. व्हिडीओ पूर्ण झाल्यानंतर धन्यवादचा संदेश आल्यावरच यू- ट्यूब बंद करायचे आहे,’ असे फर्मान प्रशासनाने जारी केले होते. ते डावलण्याची कोणाचीच बिशाद नव्हती. हे ऑनलाइन लाइव्ह संबोधन पाहताना संबंधित घटकांनी आपले नाव, शाळा, कार्यालयाचा तपशील व अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये टाकण्याची सूचनाही केली होती.
अनाकलनीय दावा
मंत्र्यांच्या या अभियानामुळे २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील इयता तिसरीपर्यंतचे प्रत्येक मूल समजपूर्वक ओघवते वाचन करू लागेल व इयत्ता आठवीमधील प्रत्येक मूल शिकण्यासाठी वाचू शकेल, असा अनाकलनीय हेतूही महावाचन अभियानामध्ये प्रशासनाने नोंदविला होता. अभियानाचा प्रत्येक विद्यार्थी आणि नागरिक दर दिवशी १० मिनिटे नवीन व सकारात्मक गोष्टींचे वाचन करेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.