पीक विमा: सांगली जिल्ह्यातील ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 01:18 PM2023-11-21T13:18:08+5:302023-11-21T13:19:40+5:30

रक्कम दिवाळीपूर्वी मिळालीच नाही 

Under the Pradhan Mantri Kharif Crop Insurance Scheme 98 thousand farmers of Sangli district have been approved by insurance companies for Rs 22 crores | पीक विमा: सांगली जिल्ह्यातील ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी मंजूर

पीक विमा: सांगली जिल्ह्यातील ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी मंजूर

सांगली : जिल्ह्यातील तीन लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेंतर्गत विमा उतरविला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये विमा कंपन्यांनी मंजूर केले आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम वर्ग करण्याचे शासनाने आदेश दिले होते. दिवाळी संपल्यानंतरही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

खरीप हंगामामध्ये तीन लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरला होता. या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये खरीप पेरणीच न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी देण्यात येणार होती. यासंबंधी राज्य शासनाने विमा कंपनीला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्ह्यांमधील सुमारे ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

पेरणी न झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती. ही रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती, पण शासनाने आदेश देऊनही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई दिली नाही. सांगली जिल्ह्यामध्ये कंपन्यांकडून कोणतेही आक्षेप घेण्यात आले नव्हते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही विमा कंपनीने सांगितले.

भरपाई कशी मिळते?

पंतप्रधान पीकविमा योजनेत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास आगाऊ नुकसान भरपाई दिली जाते. यामध्ये अपेक्षित विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंतची रक्कम आगाऊ दिली जाते. ही नुकसान भरपाई देण्यासाठी एक सूत्र निश्चित करण्यात आलंय.

रब्बीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

पंतप्रधान रब्बी पीकविमा योजनेंतर्गत रब्बी हंगामासाठी एक रुपयामध्ये विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त संख्येन पीकविमा उतरविण्याची गरज आहे, असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी व्यक्त केले.

चार दिवसांत भरपाई

शेतकऱ्यांना विमा कंपनीची भरपाई केव्हा मिळणार, यासंबंधी कृषी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. यामुळे येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Under the Pradhan Mantri Kharif Crop Insurance Scheme 98 thousand farmers of Sangli district have been approved by insurance companies for Rs 22 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.