Crime News Sangli: अंडी खरेदीचा बहाणा, आटपाडीतील वृद्ध महिलेस भरदिवसा पळवून नेऊन लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:04 PM2022-06-06T13:04:21+5:302022-06-06T13:05:18+5:30
अंडी विकत बसलेल्या वृद्ध महिलेकडे संबंधित अनोळखी इसम आला व त्याने अंडी घ्यायची आहेत असा बहाणा करुन पळवून नेऊन लुबाडले
आटपाडी : आटपाडी येथे ८३ वर्षीय वृद्ध महिलेला अंडी खरेदी करण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून पिंपरी खुर्द येथील वनक्षेत्रात नेऊन अंगावरील दागिने व रोख रकमेसह साहित्य लुटल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद जनाबाई सुखदेव नागरे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. शनिवारी (दि.४) ही घटना घडली.
आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जनाबाई सुखदेव नागरे (वय ८३ या. नांगरेमळा ता. आटपाडी जि. सांगली) या शनिवारी दुपारी आटपाडी येथील थिएटर चौकात अंडी विकत होत्या. यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला व त्याने अंडी घ्यायची आहेत असा बहाणा केला.
त्याने आणलेल्या स्प्लेंडर गाडीवर बसवून गुलाल कलेक्शन रोडने देशमुखवाडीवरून पिंपरी खुर्द येथे वनविभागाच्या हद्दीत नेले.
तेथे त्याने जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, बोरमाळ, वायरच्या पिशवीत ठेवलेले सात हजार रुपये आधारकार्ड, रेशनकार्ड व अंडी यासह पिशवी काढून घेतली. त्या ओरडत असताना त्याने उजव्या कानातील फुले, वेल व झुबे हिसका मारून ओढले. त्यामुळे त्यांच्या उजव्या कानाला दुखापत झालेली आहे.
यामध्ये ७ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे पिवळ्या धातूचे मणी-मंगळसूत्र, ५ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाची पिवळ्या धातूची बोरमाळ, ५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे एका कानातील पिवळ्या धातूचे वेल, फुले, झुबे, ७ हजार रुपये रोख रक्कम व दीडशे रुपयांची कोंबडीची अंडी असा एकूण २४ हजार १५० रुपयांचा ऐवज लंपास केला.