जांभूळ पिकल्या झाडाखाली मधुमेहाचा ढोल वाजं जी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:01 AM2019-05-09T00:01:26+5:302019-05-09T00:01:43+5:30
मधुमेहासाठी जांभूळ गुणकारी असल्याचा ढोल पिटला जात असल्याने यंदा जांभूळ भाव खाण्याचा विक्रम करीत आहे. गतवर्षी १८0 ते १९0 रुपये किलो असणाऱ्या जांभळाला आता २२० रुपये मोजावे लागत आहेत. ग्राहकांसाठी आंबट झालेली जांभळे उत्पादकांना मात्र गोड दिलासा देत आहेत.
सचिन लाड ।
सांगली : मधुमेहासाठी जांभूळ गुणकारी असल्याचा ढोल पिटला जात असल्याने यंदा जांभूळ भाव खाण्याचा विक्रम करीत आहे. गतवर्षी १८0 ते १९0 रुपये किलो असणाऱ्या जांभळाला आता २२० रुपये मोजावे लागत आहेत. ग्राहकांसाठी आंबट झालेली जांभळे उत्पादकांना मात्र गोड दिलासा देत आहेत. त्यामुळे आता ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली मधुमेहाचा ढोल वाजं जी’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून बाजारपेठेत जांभळाची आवक सुरू झाली आहे. जिल्ह्यात प्रमुख मार्गांवर जांभाळाचे स्टॉल्स् सजले असून मुख्य बाजारांमध्येही जांभळे मोठ्या प्रमाणावर विक्रीस आले आहेत. मधुमेही रुग्णांकडून जांभळास मागणी होऊ लागल्याने दर वाढले आहेत. यंदा जांभळाचा दर २२० रुपये किलोपर्यंत गेला आहे. यामध्ये आणखी दरवाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. सांगलीत कोकण परिसरातून आवक होत असते. यावर्षी चांदोली, सावंतवाडी येथून जांभळाची आवक सुरू झाली आहे. कुपवाडमधूनही आवक आहे. आवक कमी असून मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमधूनही किरकोळ प्रमाणात जांभूळ विक्रीसाठी येत असले तरी मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी आहे. यापूर्वी बालगोपाळांकडून जांभळाला मागणी असे. परंतु आता ज्येष्ठ नागरिकांकडूनही मागणी होत आहे.
सांगलीत राममंदिर चौक, बालाजी चौक, मारुती चौक, सिव्हिल चौक, विश्रामबागला रस्त्याकडेला जांभूळ विक्रीसाठी विक्रेते बसतात. काळी व आकाराने मोठी असलेली जांभळे आकर्षिक करीत आहेत. मधुमेही रुग्णांची संख्या वाढत आहे. आयुर्वेदामध्ये जांभूळ फळ व त्याच्या बियांची पूड मधुमेहावर उपचार करते, असे सांगितले जात असल्याने जांभळाला मागणी वाढली आहे. गतवर्षी दर १८0 ते १९0 रुपये किलो होता. तो यावर्षी २२० रुपयांच्या घरात गेला आहे.जांभूळ विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. जांभूळ मधुमेहावर गुणकारी असल्याचे अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक जांभूळ खरेदीस येत आहेत. येत्या पंधरवड्यात आवक न वाढल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पचनशक्तीसाठी गुणकारक
जांभूळ, पेरूमुळे पचनशक्ती वाढते, पोट साफ होते. त्यामुळे शरीरातील साखर वाढीवर काही प्रमाणात नियंत्रण येते. जांभूळ साखर कमी करण्यासाठी थेट परिणाम करते. पण यास अजून तरी वैज्ञानिक मान्यता नाही. वर्षातून उन्हाळ्यातच हे फळ खायला मिळते. याची गोडी कमी असली तरी, औषधी गुणधर्मामुळे मागणी वाढत असल्याचे दिसत आहे.