इस्लामपुरात भुयारी गटाराचे काम पुन्हा होणार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:30 AM2021-08-21T04:30:32+5:302021-08-21T04:30:32+5:30
इस्लामपूर : सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान व नागरी दलितेत्तर सुुधार योजनेंतर्गत ३ कोटी ३२ लाख आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ...
इस्लामपूर : सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान व नागरी दलितेत्तर सुुधार योजनेंतर्गत ३ कोटी ३२ लाख आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून ५ कोटी ३ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शहरासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाला १८ महिन्यांची मुदतवाढ देत संपूर्ण शहरातील भुयारी गटारांची कामे सुरू करण्याचा निर्णय झाल्याची माहिती नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.
नगरपालिका सभागृहात पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभा झाली. या सभेत आवाज ऐकू येत नाही, आमचा आवाज दाबला जातोय, कोण आमचं ऐकतच नाही, अशी मिश्कील शेरेबाजी सदस्यांकडून झाली.
भुयारी गटार योजनेच्या कामाबाबत चर्चा करण्याच्या विषयावर सर्व सदस्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. नगराध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, निनाईनगर आणि सर्व्हे क्रमांक ९१५ मधील जल:निस्सारण प्रकल्पाच्या दोन जागा पालिकेच्या ताब्यात आहेत. एका जागेसंदर्भातील न्यायालयीन निर्णय सप्टेंबर अखेरपर्यंत अपेक्षित आहे. जीवन प्राधिकरणच्या ऑनलाईन बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ज्या जागा ताब्यात आहेत, त्या परिसरातील भुयारी गटारांची कामे सुरू करण्याचे निर्देश दिले गेल्याचे सांगितले. मात्र, सर्व सदस्यांनी संपूर्ण शहरातील भुयारी गटारांची कामे सुरू करण्याचा आग्रह धरला. त्यावर संबंधित ठेकेदाराला १८ महिन्यांची मुदतवाढ देत ही कामे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आनंदराव पवार, विक्रम पाटील, वैभव पवार, शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे, डॉ. संग्राम पाटील, खंडेराव जाधव, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, संजय कोरे, शकील सय्यद, आनंदराव मलगुंडे, प्रतिभा शिंदे, सुनीता सपकाळ, बाबासाहेब सूर्यवंशी, चेतन शिंदे, प्रदीप लोहार यांनी चर्चेत सहभाग घेतला.
चाैकट
ठेकेदारावर कारवाई
८० फुटी रिंगरोडच्या १ कोटी ८२ लाख रुपये खर्चाच्या कामावरून सदस्यांमध्ये खडाजंगी उडाली. या रस्त्यावर सुशोभिकरण करता येईल, असे दुभाजक उभारण्याचा निर्णय झाला. या कामाचा ठेका कऱ्हाड येथील ठेकेदाराकडून काढून घेऊन त्याच्याकडून पालिकेची नुकसानभरपाई भरून घेण्यासाठी दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला.