कोरोनाच्या आणीबाणीत आरोग्यपंढरीचे महत्त्व अधोरेखित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:31+5:302021-04-25T04:25:31+5:30

आरोग्यपंढरी ठरलेल्या सांगली-मिरज शहरांनी कोरोना काळातही हार मानलेली नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या हजारावर गेली, तरी येथील पायाभूत ...

Underlining the importance of sanitation in corona emergencies | कोरोनाच्या आणीबाणीत आरोग्यपंढरीचे महत्त्व अधोरेखित

कोरोनाच्या आणीबाणीत आरोग्यपंढरीचे महत्त्व अधोरेखित

Next

आरोग्यपंढरी ठरलेल्या सांगली-मिरज शहरांनी कोरोना काळातही हार मानलेली नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या हजारावर गेली, तरी येथील पायाभूत सुविधा कोलमडल्या नाहीत. मृत्यूदर कमी राहिला. अन्य शहरांप्रमाणे हाहाकार माजला नाही. वैद्यकीय क्षेत्राचा पाया भक्कम असल्यानेच या जागतिक महामारीमध्ये आरोग्यपंढरी ‘डटके’ राहिली.

येथील तज्ज्ञ धन्वंतरींना अनेक दुर्धर आजारांना तोंड देण्याचा अनुभव आहे. रुग्णालये सुसज्ज व निष्णात डॉक्टरांचया फौजेसह जय्यत आहेत. सांगली-मिरजेत सुमारे साडेचारशेहून अधिक खासगी रुग्णालये आहेत. शिवाय मिरज, सांगलीतील शासकीय रुग्णालयांतही गुंतागुंतीच्या आजारांचे रुग्ण हाताळण्याची प्रचंड क्षमता आहे. याला कारणीभूत ठरले ते मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. तेथून बाहेर पडलेल्या अनेक डॉक्टरांनी येथेच रुग्णालये सुरू केली. त्यांच्या विस्ताराला पोषक वातावरण मिळत गेले. मिरजेच्या वॉन्लेसने दक्षिण- पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील रुग्णांसाठी वाट तयार केली होती, त्याच वाटेवरून रुग्णांचा ओघ खासगी रुग्णालयांकडेही कायम राहिला. त्याचा फायदा येथील वैद्यकीय क्षेत्र विस्तारण्यात झाला.

आजमितीला कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांपेक्षाही चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा येथे मिळते. अस्थिरोग, मानसोपचार, मेंदूविकार, हृदयरोग, पोटाचे आजार, कर्करोग, नेत्ररोग, त्वचारोग, स्त्रीरोग याबाबतीत रुग्णालयांची स्पेशालिटी आहे. किमान डझनभर सुपर स्पेशालिटी रुग्णालये रुग्णसेवेत गुंतली आहेत. कोरोनाच्या आणीबाणीत ती देवदुताप्रमाणे धाऊन आली. शेजारच्या सातारा जिल्ह्यात कोरोना आवाक्याबाहेर गेलेेला असताना, सांगलीत मात्र तितका हाहाकार नाही, याचे हेच कारण मानावे लागेल.

चौकट

सुसज्ज, निष्णात, अनुभवसंपन्न आणि धाडसी परंपरा

अचूक निदान व परिणामकारी उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उपकरणे व यंत्रसामग्री सज्ज आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ठसा उमटविलेले तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांना उपचार देतात. व्यसनमुक्ती, लेसर उपचार, प्लास्टिक सर्जरी, त्वचारोपण अशा क्षेत्रांतही आरोग्यपंढरीने नाव कमाविले आहे. मेंदूविकार आणि शस्त्रक्रिया तसेच मानसोपचारासाठी तर अर्ध्या महाराष्ट्रातून रुग्ण सागंली-मिरजेला येतात. ही सर्वांगीण बहरलेली आरोग्य परंपराच कोरोनाच्या आणीबाणीतही तारुन नेणारी ठरली आहे.

Web Title: Underlining the importance of sanitation in corona emergencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.