एमआयडीसीचा पाणीपुरवठा पूर्ववत
By admin | Published: June 29, 2016 11:29 PM2016-06-29T23:29:13+5:302016-06-29T23:57:00+5:30
अधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न : कुपवाड, बामणोलीतील नागरिकांसह उद्योगांना पाणी मिळणार
कुपवाड : कुपवाड व मिरज औद्योगिक वसाहतीसह कुपवाड शहरालगतची उपनगरे आणि बामणोलीतील बंद असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस शर्थीचे प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळे गुरुवारी सकाळपासून एमआयडीसीतील उद्योगांबरोबरच बामणोली आणि कुपवाडच्या उपनगरात पुरवठा पूर्ववत झाला. नागरिकांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार असल्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले.
कृष्णा नदीतील जॅकवेलजवळचा पाणीसाठा कमी झाल्यामळे कुपवाड व मिरज औद्योगिक वसाहतीसह कुपवाड शहरालगतची उपनगरे आणि बामणोलीतील पाणीपुरवठा बंद झाला होता. पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे उद्योजकांबरोबरच कामगारांचे अतोनात हाल झाले. त्यांना पाण्याविना काम करावे लागले. चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे उद्योग विकास आघाडीचे नेते डी. के. चौगुले, मनोज भोसले, जफर खान, बामणोलीचे उपसरपंच अंकुश चव्हाण आदींनी एमआयडीसीच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांनी पाणीपुरवठा बंद झाल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच जॅकवेलच्या जागेची पाहणीही केली. त्याठिकाणी त्रुटी आढळल्यानंतर त्यांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली.
त्यानंतर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रमोद शेटके, पाणीपुरवठा अभियंता एस. एस. मलाबादे, एम. डी. पवार, निरीक्षक एस. टी. नागमोती या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून शर्थीचे प्रयत्न करून बुधवारी पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत केली. बुधवारी दुपारी दोन वाजता शंभर अश्वशक्तीचा मोनोब्लॉक पंप आणि पंधरा अश्वशक्तीचे दोन सबमर्सिबल पंप बसवून कृष्णा नदीचे पाणी जॅकवेलमध्ये सोडले. त्यानंतर हे पाणी जॅकवेलमधून उचलून प्रथम पाण्याच्या टाक्या भरून घेण्यास सुरुवात झाली. हे पाणी गुरुवारी सकाळपासून उद्योगांबरोबरच नागरिकांना दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कामगारांसह उद्योजकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. (वार्ताहर)
उद्योग आघाडीकडून अधिकाऱ्यांचे कौतुक
कुपवाड व मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. ही आनंददायी बाब असून, अधिकाऱ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक उद्योग आघाडीतील सर्व उद्योजकांनी केले. यापुढील कालावधित एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, असे मत उद्योग विकास आघाडीचे नेते डी. के. चौगुले यांनी व्यक्त केले.
मोठ्या उद्योगांना फटका बसल्याने नुकसान
गेल्या पंचेचाळीस वर्षांत प्रथमच एमआयडीसीतील उद्योगांचा पाणीपुरवठा बंद पडला. त्यामुळे उद्योगाचे नुकसान झाले. कृष्णा नदीमध्ये पाणी पातळी खालावल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे मिरज व कुपवाड एमआयडीसीतील पंचवीसहून अधिक मोठ्या उद्योगांना फटका बसल्याचे उद्योजकांनी सांगितले. फटका बसलेल्या उद्योगांमध्ये स्टार्च, सायझिंगसह इतर उद्योगांचा समावेश आहे.
उपनगरांना टँकरने पाणीपुरवठा
एमआयडीसीकडून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे विवेकानंद सोसायटी, आनंदनगर, उत्कर्षनगर, सिध्दनाथ कॉलनी, विद्यानगर आदी उपनगरांतील नागरिकांचे अतोनात हाल झाले. या उपनगरातील नागरिकांची महापालिकेने जबाबदारी उचलून त्यांना टँकरने पाणी दिले. गेले दोन दिवस तीसहून अधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच महापालिकेने एमआयडीसीला तराफेही दिले. त्यामुळेच पाणीपुरवठा सुरळीत झाला.