बेवारस मृतदेह दोन तास फलाटावर
By admin | Published: July 21, 2014 11:43 PM2014-07-21T23:43:30+5:302014-07-21T23:43:30+5:30
कऱ्हाडमधील प्रकार : रेल्वे अधिकारी-पोलिसांचा वाद
मिरज : रेल्वे अधिकारी व पोलिसांच्या वादातून कऱ्हाड (जि. सातारा) रेल्वेस्थानक अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर बेवारस मृतदेह ठेवण्यात आला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानक अधीक्षक खर्चाची रक्कम देत नसल्याने रेल्वे पोलिसांनी हा प्रकार केला. स्थानक अधीक्षकाने मृतदेह नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था केल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला.
रेल्वेस्थानक परिसरातील व रेल्वेखाली सापडून मृत्यू होणाऱ्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वेकडून पोलिसांना एक हजार रुपये खर्च देण्यात येतो. कऱ्हाड येथील स्थानक अधीक्षक एम. ए. स्वामी हे मृतदेह नेण्यासाठी खर्च देत नसल्याची रेल्वे पोलिसांची तक्रार आहे. रविवारी दुपारी कऱ्हाड रेल्वेस्थानकात अंदाजे ४५ वर्षे वयाच्या अज्ञाताचा बेवारस मृतदेह प्लॅटफॉर्मवर पडला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यासाठी व दफन करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी स्थानक अधीक्षक स्वामी यांच्याकडे खर्चाची मागणी केली. स्वामी यांनी खर्च देण्यास नकार दिल्याने पोलीस नाईक विठ्ठल मदने, गोपी ठोंबरे, दीपक ठोंबरे यांनी बेवारस मृतदेह स्थानक अधीक्षक स्वामी यांच्या कक्षाबाहेर फलाटावरच ठेवला. तब्बल दोन तास मृतदेह फलाटावर पडून होता. मात्र तरीही स्वामी यांनी खर्च देण्यास ठाम नकार दिला. अखेर स्वामी यांनी मृतदेह नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था केल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला.
रेल्वेस्थानक परिसरात मनोरुग्ण व भिकारी, वृध्द, आजारी यासह अपघातात रेल्वेखाली सापडलेल्या बेवारसांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. बेवारस किंवा वारस असलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वे पोलिसांना खर्च देण्याची तरतूद आहे. मात्र कऱ्हाड रेल्वेस्थानकात स्थानक अधीक्षकांनी गेले वर्षभर मृतदेह विल्हेवाटीचा खर्च दिलेला नाही. यामुळे पोलीस स्वखर्चाने मृतदेहाचे सोपस्कार पार पाडत आहेत. रेल्वे अधिकारी व पोलिसांच्या वादातून हा प्रकार घडला. स्थानक अधीक्षक स्वामी यांच्याबाबत रेल्वे व्यवस्थापकांकडे तक्रार करण्यात आल्याचे मिरज रेल्वेचे निरीक्षक रमेश भिंंगारदेवे यांनी सांगितले. (वार्ताहर)