बेरोजगारांना गंडा, टोळी मात्र मोकाट

By admin | Published: July 17, 2014 11:31 PM2014-07-17T23:31:12+5:302014-07-17T23:40:09+5:30

नोकरीचे आमिष : ठकसेनांकडे लक्ष कधी देणार?

The unemployed people, however, do not hesitate | बेरोजगारांना गंडा, टोळी मात्र मोकाट

बेरोजगारांना गंडा, टोळी मात्र मोकाट

Next

अर्जुन कर्- कवठेमहांकाळ
सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेकार तरुण ठकसेनांचा बळी ठरत आहेत. या वर्षात सैन्यभरती व रेल्वेभरतीच्या आमिषाने शेकडो तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना उघडकीस आल्या. या ठकसेनांच्या मुसक्या आवळून तरुणांचे पैसे मिळवून देणे, हे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची परंपरा आहे. या परंपरेत रांजणी गाव आघाडीवर आहे. परंतु या गावातीलच पिता-पुत्राच्या एका जोडीने, कोल्हापूर येथील संदीप गुरव या भामट्याच्या सहकार्याने तालुक्यातील पन्नासवर सुशिक्षित बेकार युवकांना, सैन्यात भरती करतो म्हणून प्रत्येकी तीन लाख रुपये उकळले आहेत. या युवकांना भरती करतो म्हणून पुणे येथे नेऊन लॉजवर ठेवले व खोटी नियुक्तीपत्रेही दिली. परंतु फसगत झाल्याचे तरुणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने संदीप गुरव यास अटकही केली. परंतु रांजणीतील ज्या पिता-पुत्राच्या जोडीने कोट्यवधी रुपयांची माया गुरवच्या नावावर जमवून, भरती करतो म्हणून सांगितले, त्या संशयित पिता-पुत्राची जोडी मात्र तालुक्यात उजळमाथ्याने फिरत आहे. कारण पैसे बुडतील या भीतीने तरुणांनी या जोडीविरुद्ध अद्याप पोलिसात तक्रार दिलेली नाही.
रांजणीतील या संशयित पिता-पुत्राच्या जोडीचे मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांशी व राजकीय व्यक्तींशी लागेबांधे असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही जोडगोळी बिनधास्तपणे फिरत आहे. तालुक्यातील कवठेमहांकाळ, इरळी, आरेवाडी, जाखापूर, अलकूड (एस), अग्रण धुळगाव आदी गावातील पन्नासवर युवक या एजंटांच्या जाळ्यात अडकले आहे. या युवकांकडून या ठकसेनांनी प्रत्येकी तीन लाख याप्रमाणे तब्बल दीड कोटीवर माया जमा केली आहे.
अग्रण धुळगाव येथील सुरेश रंगराव भोसले या एजंटास पोलिसांनी अटक केली. परंतु या सैन्यभरती फसवणुकीतील मुख्य सूत्रधार रांजणीची पिता-पुत्राची जोडी अद्यापही मोकाटच आहे. त्यांना पकडणे हेच पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
एका वर्षापूर्वी कुकटोळी येथील संभाजी भंडारे या निवृत्त सैनिकानेही कोल्हापूर येथील एका ठकसेनाच्या सहकार्याने रेल्वेत भरती करतो म्हणून म्हैसाळ (एम), करोली (टी), आगळगाव, बंडगरवाडी या गावातील पंचवीस तरुणांना प्रत्येकी तीन लाख याप्रमाणे सत्तर लाखाच्या वर गंडा घातला व फसवणूक केली. या भंडारेला कवठेमहांकाळ व मिरज पोलिसांनी अटकही केली. परंतु तो सध्या जामिनावर खुलेआम फिरत आहे.
४पोलिसात तक्रार केल्यामुळे, फसगत झालेल्या सुशिक्षित बेकार तरुणांनी या एजंटांना दिलेले पैसे हे एजंट परत देत नाहीत. त्यामुळे कायद्यासमोर व पोलिसांसमोर फसगत झालेल्या तरुणांच्या पैसे वसुलीचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. सैन्यभरती व रेल्वेभरती करणाऱ्या मुख्य बोगस सूत्रधारापर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचणार का, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे.
--पुणे पोलिसांनी अटक केलेल्या संदीप गुरवला एका तरुणापाठीमागे एक लाख साठ हजार रुपये या रांजणीच्या पिता-पुत्राच्या जोडीने दिले. काहींचे दिलेच नाहीत. वरचे सर्व पैसे या जोडीने लाटले असल्याचे गुरवच्या चौकशीतून समोर आले आहे. काही तरुणांनी दहा टक्के व्याजाने, तर काही तरुणांनी जमीन विकून या पिता-पुत्राला पैसे दिले आहेत. हे फसवणूक प्रकरण दडपले जावे, आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू नयेत म्हणून रांजणीच्या एजंटाने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचे नाटक केले. मात्र तो नातेवाईकांकडे रहात आहे, तर त्याचा बाप रांजणीत थाटात फिरत आहे.

Web Title: The unemployed people, however, do not hesitate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.