रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा : रमजानच्या उपवासातही कोरोनाशी अखंड लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:10 PM2020-05-21T17:10:53+5:302020-05-21T17:15:12+5:30

प्रत्येकाला चोवीस तास सतर्क राहून युद्धजन्य स्थितीशी दोन हात करावे लागतात. कोरोनासह विविध श्वसनविकाराचे रुग्ण येताच तात्काळ एक्स-रे काढला जातो. ही जबाबदारी जिलानी शेख, रफिक हुजरे हे क्ष-किरण तंत्रज्ञ पार पाडतात.

Uninterrupted fight with Corona even during Ramadan fasting | रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा : रमजानच्या उपवासातही कोरोनाशी अखंड लढा

मिरज कोविड रुग्णालयात संशयिताचा एक्सरे काढताना असे पीपीई कीट वापरावे लागते.

googlenewsNext
ठळक मुद्दे कोविड रुग्णालयातील रोजा केलेले कर्मचारीही युद्धजन्य परिस्थितीत आघाडीवर

संतोष भिसे ।

सांगली : मिरजेच्या कोविड रुग्णालयातील मुस्लिम कर्मचारी रमजानच्या महिन्यात खऱ्याअर्थाने मानवतेची सेवा करत आहेत. दिवसभर कडकडीत उपवास करतानाच कोरोनाबाधितांच्या सेवेतही ते आघाडीवर आहेत. त्यांच्यासाठी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा ठरली आहे.

कोरोनाच्या संकटकाळात रमजानचे रोजे सुरू आहेत. मिरजेतील कोविड रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, सफाई कर्मचारी असे मुस्लिम कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्यासाठी रोजे महत्त्वाचे असले तरी रुग्णसेवाही तितकीच प्राधान्याची आहे. कोविड रुग्णालयाचा प्रत्येक दिवस युद्धजन्य ठरतो. प्रत्येकाला चोवीस तास सतर्क राहून युद्धजन्य स्थितीशी दोन हात करावे लागतात. कोरोनासह विविध श्वसनविकाराचे रुग्ण येताच तात्काळ एक्स-रे काढला जातो. ही जबाबदारी जिलानी शेख, रफिक हुजरे हे क्ष-किरण तंत्रज्ञ पार पाडतात. अनेकदा कोरोना कक्षात जाऊन पोर्टेबल यंत्राने रुग्णाचा एक्स-रे काढावा लागतो.

अशावेळी पीपीई कीटमध्ये होणारी तगमग सहनशीलतेची परीक्षा पाहते. डॉ. अनाम, डॉ. फेमी मुकादम, डॉ. नाएला आझमी, डॉ. शमायला आझमी, डॉ. अब्दुलकादर चमनशेख, डॉ. रफिक शेख हे डॉक्टर्सही उपवासकाळात कोरोनाची खिंड लढवत आहेत. कोरोनाबाधितांशी परिचारिकांचा थेट संपर्क येतो. सुग्रा नदाफ, जमिला पठाण, सोनम तेरदाळकर, इरफान तेरदाळकर हा परिचरवर्ग उपवासाचे पावित्र्य जपत रुग्ण कोरानामुक्त करण्यासाठी संघर्ष करत आहे. स्वच्छतेची कामे करणा-या रशिद सय्यद यांच्यासारख्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची जबाबदारीही तितकीच मोलाची ठरते.


पहाटे चारपासूनच दिनक्रमाची सुरुवात
रमजानच्या उपवासाच्या निमित्ताने मुस्लिम कर्मचाऱ्यांचा दिनक्रम पहाटे चारपूर्वीच सुरू होतो. अंघोळ, नमाज यानंतर पुन्हा रुग्णालयातील ड्युटी सुरू होते. कोरोना रुग्णालयात काम करत असल्याने घरात प्रवेशापूर्वी पुन्हा अंघोळ अपरिहार्य ठरते. रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागते. या सगळ््या कसरतीनंतरही रुग्णसेवेत खंड पडलेला नाही.

 

ड्युटी सुरूझाली की रुग्णसेवेशिवाय अन्य कशालाही प्राधान्य नसते. कोविड रुग्णालय घोषित झाल्याने डॉक्टरांसह सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. रमजानच्या काळातही अखंड सेवा सुरू आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडलेल्या रुग्णाच्या डोळ््यांतील आनंद उपवासाचे पुण्य द्विगुणित करतो.
- डॉ. फेमा मुकादम


 

Web Title: Uninterrupted fight with Corona even during Ramadan fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.