अंकलीतील युनियन बँकेला २ कोटी ७० लाखांचा गंडा, तारण जमिनीची किंमत वाढवून कर्ज उचलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 03:27 PM2022-06-01T15:27:34+5:302022-06-01T15:28:32+5:30
बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यासह तिघांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सांगली : अंकली (ता. मिरज) येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेची दोन कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यासह तिघांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जासाठी तारण जमिनीची किंमत वाढवून बँकेचा विश्वासघात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कर्जदार आनंद वसंत ढेकणे (४५, रा. विटा), मूल्यांकन करणारे विजयकुमार बसाप्पा पाटील (५२, रा. सांगली) आणि तत्कालीन बँकेच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. बँकेच्या व्यवसाय शाखा व्यवस्थापक रूपाली रघुनाथ आंबेकर (३४, रा. बस्तवडे, ता. तासगाव) यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे.
आनंद ढेकणे याची आदित्य टेक्सटाइल्स ही कंपनी आहे. त्याने व्यवसाय व यंत्रसामग्री खरेदीसाठी मे २०१६ मध्ये युनियन बँकेकडे तीन कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव दिला होता. या कर्जासाठी भांबे (ता. पाटण, जि. सातारा) येथील सहा हजार ७४६ चौरस किलोमीटर जमीन तारण दिली होती. बँकेकडे या जमिनीचे मूल्यांकन चार कोटी ७३ लाख इतके सादर केले. मूल्यांकनासाठी विजयकुमार पाटील याने ढेकणे याला मदत केली. पाटील याने खोटा मूल्यांकन अहवाल दिला. त्यानंतर बँकेच्या विभागीय अधिकाऱ्याने या जमिनीच्या साठेखतावर त्याचे मूल्यांकन एक कोटी असल्याचे दिसत असतानाही दोन कोटी ७० लाखांचे कर्ज मंजूर केले.
त्यानंतर ढेकणेने यंत्र खरेदीसाठी चीनमधील हँगोऊ वीलटाॅप इन्पोर्ट आणि एक्स्पोर्ट कंपनीला एक कोटी रुपये पाठविण्यास बँकेला सांगितले. पण कंपनीकडून कोणतीही यंत्रसामग्री खरेदी न करता एक कोटीचा अपहार केला. बँकेच्या कॅश क्रेडिटवरील एक कोटी ७० लाख रुपये वेळोवेळी उचलले. मंजूर केलेले कर्ज त्याच कामासाठी न वापरता बँकेचा विश्वासघात केला. स्वत:च्या फायद्यासाठी बँकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.