अनोखा विवाह : महापुरुषांच्या विचारांचा वऱ्हाडी मंडळींत जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 10:47 AM2020-11-05T10:47:45+5:302020-11-05T10:50:37+5:30
Marrige, Constitution Day, Sangli महापुरुषांच्या विचारांचा जागर व त्यांच्या प्रतिमांना वंदन करून भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने मिरज तालुक्यातील करोली (एम) येथे अनोखा सत्यशोधक विवाह पार पडला. फुलांच्या अक्षतांनी सुगंधित होतानाच सुंदर व मानवतावादी विचारांचा दरवळही सर्वदूर पोहोचवत लग्नगाठ बांधली गेल्याने, या विवाहाने हजारो मने जिंकली.
सांगली : महापुरुषांच्या विचारांचा जागर व त्यांच्या प्रतिमांना वंदन करून भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने मिरज तालुक्यातील करोली (एम) येथे अनोखा सत्यशोधक विवाह पार पडला. फुलांच्या अक्षतांनी सुगंधित होतानाच सुंदर व मानवतावादी विचारांचा दरवळही सर्वदूर पोहोचवत लग्नगाठ बांधली गेल्याने, या विवाहाने हजारो मने जिंकली.
मराठा समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते ए. डी. पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सत्यशोधक विवाहाचा पुरस्कार व प्रसार केला. त्यांच्या पुढाकाराने असे अनेक विवाह नोंदले गेले. त्यांच्या पुतण्याचा विवाहसुद्धा याच सत्यशोधक परंपरेनुसार करताना त्यांनी अनेक चांगल्या प्रथांना सुरुवात केली. गोविंदराव पाटील यांचे पुत्र महादेव आणि म्हैसाळ येथील मारुती सावंत यांची कन्या स्नेहलता यांचा विवाह समाजासाठी दिशादर्शक बनला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना हाती घेत वधु-वरांचा लग्नमंडपात प्रवेश झाला. महाराष्ट्रात आणि देशभरात अक्षतांच्या माध्यमातून लाखो क्विंटल तांदूळ वाया जात असल्याने, फुलांच्या अक्षता ठेवण्यात आल्या होत्या. फुलांच्या अक्षतांसह महापुरुषांच्या विचारांचे एक पत्रक लग्नमंडपात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांच्या व मित्रमंडळींच्या हाती दिले गेले. फुलांनी मंडप व स्टेज सजवितानाच महापुरुषांच्या प्रतिमांनीही लग्नसमारंभ सजला होता. स्टेजवर वधु-वरांच्या बाजूलाही अशा प्रतिमा व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता.
निसर्गाप्रती प्रेम म्हणून दोन वृक्षही याठिकाणी ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना व प्रतिमांना वंदन करण्यात आले. भूमिपुत्रांचा खरा आदर्श म्हणजे धरणीमाता असल्याने पृथ्वीची पूजा करण्यात आली. आम्रवृक्षाच्या रोपाला पाणी देऊन तिला वंदन करण्यात आले. संविधान व उपस्थितांच्या साक्षीने तसेच डॉ. विजय गायकवाड यांनी गायिलेल्या सत्यशोधक मंगलाष्टकांनी हा विवाह पार पडला.
पुस्तकांनी वेधले लक्ष
लग्नमंडपात पुस्तकांचा मांडलेला रुखवत लक्षवेधी ठरला. अनेक महापुरुषांची पुस्तके याठिकाणी मांडण्यात आली होती. ह्यज्ञानाचा रुखवतह्ण असा फलक याठिकाणी लावण्यात आला होता.