मिरजेत बेघर केंद्रात ज्येष्ठांचा अनोखा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:29 AM2021-09-23T04:29:01+5:302021-09-23T04:29:01+5:30
मिरज : मिरजेतील आस्था बेघर महिला केंद्रात पाषाण पुणे येथील शालिनी (वय ६६) व कवठेएकंद (ता. तासगाव) येथील ...
मिरज : मिरजेतील आस्था बेघर महिला केंद्रात पाषाण पुणे येथील शालिनी (वय ६६) व कवठेएकंद (ता. तासगाव) येथील निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे (वय ७९) या विधवा व विधूर ज्येष्ठांचा अनोखा विवाह पार पडला. या केंद्रात यापूर्वी अनाथ निराधार मुलींचे विवाह झाले आहेत. येथे ज्येष्ठ दांपत्यासही पुढील आयुष्यासाठी सोबती मिळाला आहे.
बेघर केंद्रातील आश्रित शालिनी यांच्या पतीचे, मुलाचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांनी बेघर केंद्रात आश्रय घेतला. निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे यांच्याही पत्नीचे निधन व मुलांचे विवाह झाल्यानंतर ते एकटे पडले. वृद्धापकाळात कष्ट होत नाही. वेळेवर पोटाला मिळत नाही. त्यामुळे पुढील आयुष्यात जोडीदारासाठी त्यांनी मुलाची सहमती घेतली. त्यांना मिरजेत बेघर केंद्रात जीवनाची सोबती सापडली. दोघांनी एकमेकांचे सुख दुःख वाटून घेण्याचा निर्णय घेतला.
ज्येष्ठ वधू-वरांचे समुपदेशन करण्यात आले. भविष्यातील वाटचाल एकमेकांना समजून घेऊन व्यतीत करायचे ठरले. मुहूर्त ठरला, सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडले. समाजसुधारक सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व वृक्षाला पाणी घालून, फुलांच्या अक्षदा टाकण्यात आल्या. कालबाह्य पद्धतींना फाटा देत, वयाचे बंधन झुगारून, पार पडलेल्या या अनोख्या विवाह सोहळ्याचे सर्वांनी कौतुक केले.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त चंद्रकांत आडके यांनीही या विवाह सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत चालवण्यात येणाऱ्या आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे, केंद्र संचालिका सुरेखा शेख, वंदना सवाखंडे, सखी सेंटरच्या अश्विनी नागरगोजे, रुपाली काळे, प्रतिभा भंडारे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शेडगे, सुरेश बनसोडे, सविता काळे, पूजा मोहिते यांनी संयोजन केले. वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी बेघर केंद्रातील समदुःखी महिला व मान्यवर उपस्थित होते.