सांगलीत भाजपच्या फळीस एकसंध काँग्रेसचा हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 03:18 PM2019-10-26T15:18:36+5:302019-10-26T15:20:43+5:30
भाजपने सांगली विधानसभेची निवडणूक एकतर्फी असल्याचा समज केला होता. जयश्रीताई पाटील यांच्याऐवजी पृथ्वीराज पाटील यांचे मैदानात येणे जास्त फायद्याचे ठरेल, असेही त्यांना वाटले. त्यामुळे उमेदवारी त्यांना जाहीर झाल्यापासून भाजपच्या गोटात आनंद होता.
अविनाश कोळी ।
सांगली : गेल्या पाच वर्षांच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला चारीमुंड्या चित करणाऱ्या भाजपला या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जबरदस्त हादरा दिला. काँग्रेस एकसंध झाली तर काय होऊ शकते, याची प्रचिती या लढतीमधून आली. भाजपने ही लढत जिंकली असली तरी, काँग्रेसच्या नव्या चेहºयाने दिलेली झुंज लोकांची मने जिंकणारी ठरली.
भाजपने सांगली विधानसभेची निवडणूक एकतर्फी असल्याचा समज केला होता. जयश्रीताई पाटील यांच्याऐवजी पृथ्वीराज पाटील यांचे मैदानात येणे जास्त फायद्याचे ठरेल, असेही त्यांना वाटले. त्यामुळे उमेदवारी त्यांना जाहीर झाल्यापासून भाजपच्या गोटात आनंद होता. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत अत्यंत सोपा वाटणारा हा पेपर भाजपसाठी गतवेळेपेक्षा अधिक अवघड व घाम फोडणारा ठरला.
वसंतदादा घराण्याला या निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसली तरी, पक्षहितासाठी वसंतदादा घराणे पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी ठामपणे व प्रामाणिकपणे उभे राहिले. त्यात पुन्हा राष्टÑवादीची प्रामाणिक साथ लाभणे, हा लाभाचा योग होता. २0१४ च्या निवडणुकीत याच राष्टÑवादीचा लाभ भाजपला झाला होता. त्यामुळे भाजपलाही स्वबळावर हा गड काबीज करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायचे होते. दोन्हीकडून युद्धाची तयारी सुरू झाली, मात्र भाजप काँग्रेसच्या ताकदीबद्दल गाफील राहिली आणि त्यामुळेच निवडणुकीत मताधिक्य प्रचंड घटले. विजयासाठी शेवटपर्यंत ह्यसलाईनह्णवर राहावे लागले. भाजपने लढत जिंकली असली तरी, त्यांच्या ताकदीला जबरदस्त हादरे देण्यात काँग्रेस यशस्वी ठरली.