आंबेडकरांचा भारत घडविण्यासाठी संघटित व्हा
By admin | Published: April 24, 2017 11:44 PM2017-04-24T23:44:10+5:302017-04-24T23:44:10+5:30
सदाभाऊ खोत : इस्लामपुरात फुले-आंबेडकर जयंती; नागनाथअण्णा यांना मरणोत्तर पुरस्कार
इस्लामपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे. समाजातील कष्टकरी, शेतकरी आणि वंचित व दुबळ्या घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांचे विचार आचरणात आणून भारतीय लोकशाही सुदृढ करायला हवी, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात वाळवा तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने फुले, आंबेडकर जयंती महोत्सव झाला. यावेळी क्रांतिवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना मरणोत्तर ‘रिपब्लिकन मित्र’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. खोत यांच्याहस्ते हुतात्मा कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच खोत यांच्या मातोश्री रत्नाबाई खोत यांना माजी आमदार भगवानराव साळुंखे, अरुण कांबळे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याहस्ते ‘माता रमाई’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी रमाई पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी आम्ही इस्लामपूरकर कल्चरल गु्रपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला.
सिनेस्टार निवास कळसे यांच्या नृत्य समूहाचा कलाविष्कार कार्यक्रम झाला. सतीश चिके या अपंग कलाकाराने रसिकांची मने जिंकली. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांच्याविषयी व त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि त्यांचे समाजाला असणारे मोठे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
आरपीआयचे राज्य सचिव अरुण कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महेश परांजपे यांनी आभार मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, सागर खोत, नगरसेविका कोमल बनसोडे, प्रतिभा शिंदे, अन्नपूर्णा फल्ले, सीमा पवार, मयुरी मेश्राम, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, अमर बनसोडे, रोहन धुमाळे, राजू वाघमारे, दयानंद सुर्वे, बाळासाहेब कांबळे, किशोर जाधव आदींसह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)