विद्यापीठ उपकेंद्र कवलापुरातच व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:49 AM2021-03-04T04:49:04+5:302021-03-04T04:49:04+5:30
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळाच्या जागेत व्हावे, अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने करण्यात ...
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळाच्या जागेत व्हावे, अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने करण्यात आली आहे. टाळाटाळ झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० टक्के महाविद्यालये महापालिका क्षेत्रात आहेत. उपकेंद्रासाठी सुमारे ७५ ते ८० एकर जागेची आवश्यकता आहे. कवलापूर विमानतळाची जागा सुमारे १६८ एकर इतकी आहे. ही जागा सर्वदृष्टीने योग्य असून, या जागेतच उपकेंद्र व्हावे.
कवलापूरची जागा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरेल. उपकेंद्रासाठी लोकप्रतिनिधी खानापूरच्या जागेचा अट्टाहास करीत आहेत. मात्र, खानापूरची जागा सर्वदृष्टीने अयोग्य आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तेथे जाण्यास अनेक अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठाचे उपकेंद्र महत्त्वाचे असून, त्यासाठी कवलापूरची जागा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. कवलापूरच्या जागेसाठी महाविद्यालये, महापालिका आणि अनेक ग्रामपंचायतींचा ठराव घेणार आहे. जर हे उपकेंद्र सांगलीजवळ तातडीने उभारले नाही, तर विद्यार्थ्यांचा लढा उभारण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.