सांगलीत अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त

By Admin | Published: September 26, 2016 11:12 PM2016-09-26T23:12:38+5:302016-09-26T23:14:27+5:30

तीन हजारावर कर्मचारी : सकाळी सहापासून नाकाबंदी; सायंकाळी सहापर्यंत वाहतूक बंद

An unprecedented police settlement in Sangli | सांगलीत अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त

सांगलीत अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त

googlenewsNext

सांगली : मंगळवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी सांगलीत अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक व बाहेरील जिल्ह्यातील असे सुमारे ३ हजार १२५ पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी बंदोबस्ताचा आढावा घेतला. तत्पूर्वी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली. मंगळवारी पहाटे बंदोबस्त सुरू होणार आहे. सकाळी सहापासून नाकाबंदी करून वाहतूक बंद केली जाणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलिस दलाकडून पंधरवड्यापासून तयारी सुरू आहे. वाहतूक तसेच पार्किंगचे दोन दिवसांपूर्वी नियोजन पूर्ण झाले होते. त्यानंतर बंदोबस्ताची तयारी करण्यात आली.
सोमवारी दुपारी चारपासून सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर, काँग्रेस भवन, राममंदिर चौक, पुष्पराज चौक, मराठा सेवा संघाचे कार्यालय, विश्रामबाग, मार्केट यार्ड, माधवनगर रस्त्यावरील संपत चौक, माधवनगरचा जकात नाका, बुधगावचे वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालय याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक पॉर्इंटला दहा ते बारा पोलिस होते. मोर्चामुळे शहरातील वाहतूक बंद केली जाणार असल्याने दुपारीच शहरातील लहान-मोठ्या चौकात बॅरिकेटस् लावण्यात आले होते. मंगळवारी पहाटे साडेपाचला बंदोबस्त तैनात करुन सहानंतर वाहतूक बंद केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

विश्वास नांगरे-पाटील सांगलीत
कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सांगली दौऱ्यावर आले. सायंकाळी त्यांनी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात भेट देऊन संयोजकांकडून मोर्चाच्या नियोजनाची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसप्रमुख शिंदे यांच्याकडून बंदोबस्त तसेच सुरक्षेबाबत माहिती घेतली.


रिक्षा, वडाप बंद
रिक्षाचालकांनी मोर्चास पाठिंबा देऊन रिक्षा बंद पुकारला आहे. शहरातील वाहतूकच बंद राहणार असल्याने ‘वडाप’ चालकांचाही अनेक मार्गावर बंद आहे. सांगली, मिरजेतील सर्व रिक्षा संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत.

संयोजकांनी जी आचारसंहिता ठरवून दिली आहे, त्याचे मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने पालन करावे. त्यामुळे गोंधळ होणार नाही. मोर्चात पुढे जागा असेल तर जावे, अन्यथा आहे त्या जागेवर थांबावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. काही माहिती मिळाल्यास पोलिस मुख्यालयातील कंट्रोलला कळवावी.
- दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलिसप्रमुख.

Web Title: An unprecedented police settlement in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.