Sangli: शिराळा, वाळवा तालुक्याला गारांसह वादळी पावसाने झोडपले
By अशोक डोंबाळे | Published: May 10, 2024 05:19 PM2024-05-10T17:19:26+5:302024-05-10T17:19:42+5:30
सांगली : कुरळप (ता. वाळवा) येथे आज, शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. एक तास पडलेल्या ...
सांगली : कुरळप (ता. वाळवा) येथे आज, शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. एक तास पडलेल्या पावसाने रस्ते अगदी गारांनी पांढरेशुभ्र झाले होते. ऐतवडे बुद्रुक, कार्वे, चिकुर्डे व परिसरात दमदार पाऊस झाला. तसेच येळापूर (ता. शिराळा) येथेही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी ढगाळ हवामान होते.
गेले दोन महिने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पाण्याविना ऊस व भाजीपाला पिके वाळू लागली होती. या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. सध्या खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेती मशागतीसाठी अशा पावसाची शेतकऱ्यांना गरज होती. कित्येक दिवसापासून शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या.
आज, शुक्रवारी दुपारी वाळवा तालुक्यातील कुरळप, ऐतवडे बु्द्रुक, कार्वे, चिकुर्डे परिसरात वादळी वारे, गारांसह पावसाने दमदार हजेरी लावली. तासभर झालेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिले होते. येळापूर परिसरात उन्हाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.