सांगली जिल्ह्यात मेघगर्जेनसह अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना फायदा, द्राक्ष, डाळिंब उत्पादकांना फटका
By अशोक डोंबाळे | Published: November 8, 2023 11:23 AM2023-11-08T11:23:22+5:302023-11-08T11:23:42+5:30
ऊस पट्ट्यात तोडी थांबल्याने साखर कारखान्यांचे गाळप ठप्प
सांगली : जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी मेघगर्जेनसह झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष, डाळिंब बागांना सर्वाधिक फटका बसला. जोरदार झालेल्या पावसामुळे ऊस तोडी थांबल्या असून साखर कारखान्यांचे गाळप ठप्प झाले आहे. यापावसामुळे रब्बी पिंकाना मात्र दिलासा मिळाला आहे.
वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला सकाळपासूनच पावसाने झोडपले. यामुळे ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांची दैना उडाली. विजांचा कडकडाट, मेघगर्जेनसह आष्टा, इस्लामपूर, पेठ परिसरात जोरदार पाऊस झाला. पलुस, कडेगाव, मिरज, तासगाव, खानापूर, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली.
आटपाडी तालुक्यात जोरदार पावसामुळे ज्वारी, मका किंवा इतर रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र डाळिंब उत्पादक शेतकर्यांचे पावसाने मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकर्यांचे डाळिंब विक्रीसाठी जाणार होते. काहींचा पहिला तोडा झाला असून दुसरा तोडा होणार होता. मात्र अचानक ढगाळ वातावरणासह पावसाने लावलेली हजेरी यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.
कुजव्या, भुरीचा फैलाव वाढणार
बुधवारी पावसाने लावलेल्या हजेरीने डाळींब बागांमध्ये फळ झाडांनाच राहिली आहेत. परिणामी फळांना कुजवा रोग लागण्याची दाट शक्यता आहे. द्राक्ष बागांमध्ये भुरी रोगाचा फैलाव वाढणार आहे.