सांगली, मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्षबागांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:20 PM2022-11-25T12:20:27+5:302022-11-25T13:13:52+5:30
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली
सांगली : जिल्ह्यात गुरुवारी रात्री सांगली, मिरज शहरास कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा निर्यातक्षम द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
द्राक्षबागांच्या छाटणीवेळीही अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक प्रयत्नातून द्राक्षबागा वाचविल्या आहेत. तोपर्यंत गुरुवारी रात्री साडेसात वाजल्यानंतर जवळपास अर्धातास सांगली, मिरज शहरांसह कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतात पाणी साचल्याने ऊसतोडी रखडल्या आहेत, तर ऐन फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांच्या हंगामालाही फटका बसणार आहे.
जिल्ह्यातील पूर्व भागासह काढणीला आलेले आणि फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज शहरात रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली.
कवठेमहांकाळला अर्धा तास हजेरी
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी, कोंगणोळी, करोली टी, शिंदेवाडी, म्हैसाळ एम. परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दुपारपासून कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांमध्ये यामुळे भीती निर्माण झाली आहे