तोडगा निघेपर्यंत कारखाने बंद : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 04:53 PM2019-11-19T16:53:51+5:302019-11-19T16:55:31+5:30
या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले.
सांगली : ऊस दराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्यात येतील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, युवा आघाडी अध्यक्ष संजय बेले, वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव, अॅड. शमशुद्दीन संदे, उपाध्यक्ष वसंतराव सुतार, महेश जगताप, भरत चौगुले यांनी सोमवारी जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेऊन दराचा तोडगा निघेपर्यंत कारखान्यांचे गळीत हंगाम बंद ठेवण्याची मागणी केली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले.
प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, ऊस दराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. संघटनेची ऊस परिषद दि. २३ रोजी आहे. ऊस परिषदेत दराची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ऊस दराचा तोडगा निघत नाही, तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आपण पुढाकार घेऊन सांगली जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद ठेवावेत, अशी विनंती त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली होती.
...तर तोडी बंद पाडू, वाहतूक रोखणार : खराडे
ऊस दराचा तोडगा निघाला नाही, तोपर्यंत कारखानदारांनी गळीत हंगाम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारखानदारांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय तोडी सुरू ठेवल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्या तोडी बंद पाडण्यात येतील. तसेच ऊस वाहतूक वाहने रोखण्यात येणार आहेत. वाहनांची मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी कारखानदार व राज्य सरकारची राहील, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.