अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 04:35 PM2021-11-18T16:35:16+5:302021-11-18T16:35:51+5:30
सांगली : जिल्ह्यात तासगाव, आटपाडी, मिरज, जत, शिराळा, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी ...
सांगली : जिल्ह्यात तासगाव, आटपाडी, मिरज, जत, शिराळा, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा द्राक्ष, फुले आणि भाजीपाला पिकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. डाऊनी, कुजवा रोगाच्या प्रादुर्भावाने द्राक्षबागा वाया जाणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. आजही ढगाळ वातावरण जिल्ह्यात आहे. याचा फटका द्राक्षबागांना बसला आहे. तासगाव, मिरज तालुक्यातील द्राक्षबागांनी बहर धरला आहे. त्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष घडामध्ये कुजीची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकरी चिंतित आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे जत तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत. फ्लोरिंग बागांवर सलग तिसऱ्या वर्षी दावण्या, बॅक्टेरिया, मणी गळती, कुजवा, भुरी रोगाचे संकट उभा राहिले आहे. यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी जादा खर्च करण्याची वेळ आली आहे. खानापूर तालुक्यातील भाळवणी, कळंबी परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.
शिराळा पश्चिम भागात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. ओढे, नाले भरून वाहिले तर अनेकांच्या शेतात पाणी साचले आहे. पावसाचा ऊसतोडणी आणि शेतीच्या कामावर परिणाम झाला.
फुलोरा कुजण्याची भीती
शेतकऱ्यांनी यंदा द्राक्षबाग जोमात आणल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या सरीमुळे शेतकरी चिंतित आहेत. त्यातच दोन दिवसात पडलेल्या अवकाळी पावसाने फुलोऱ्यामध्ये आलेल्या बागांमधील द्राक्ष घड कुजण्याची भीती आहे. यामुळे शेतकरी कीटकनाशक औषध फवारणी करून कंटाळला आहे.
जिल्ह्यात रविवारपर्यंत पावसाचा मुक्काम
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पूर्व-मध्य अरबी समुद्र व दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दि. १८ ते २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम असणार आहे. या कालावधीत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.