असामान्य नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:29 AM2021-03-01T04:29:22+5:302021-03-01T04:29:22+5:30
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात दादांनी आपला स्वतःचा एक सांगली परिसरात ग्रुप बनविला होता. त्या ग्रुपने टेलिफोनच्या तारा तोडल्या, मालगाडी ...
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात दादांनी आपला स्वतःचा एक सांगली परिसरात ग्रुप बनविला होता. त्या ग्रुपने टेलिफोनच्या तारा तोडल्या, मालगाडी पाडली, रेल्वे स्टेशने जाळली, चावड्या पेटविल्या आणि ब्रिटिश यंत्रणेला धक्का देऊन सुचविले की, आम्हाला तुमची जुलमी सत्ता नको आहे आणि त्याकरिता भूमिगत राहून आमचा लढा चालू राहणार आहे. दादांनी सांगली जेलमधून हत्यारे घेऊन घेतलेली उडी ही दादांच्या कर्तृत्वाचा शुभारंभ होता. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर काँग्रेस पक्ष संघटना नव्या जोमाने बांधणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि गांधी-नेहरूंच्या काँग्रेसचा एक सैनिक म्हणून दादा काम करू लागले. गावात काँग्रेस समितीचे चिटणीस म्हणून दादांनी पक्ष संघटनेच्या कामाचा शुभारंभ केला. नंतर तासगाव तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून दादांनी यशस्वी भूमिका पार पाडली. त्यानंतर सातारा जिल्हा काँग्रेसचे चिटणीस म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यासाठी अनंत कष्ट घेतले आणि महाराष्ट्रभर असंख्य कार्यकर्त्यांचा संच आपल्या सभोवताली उभा केला.
माणसांची पारख करण्याची त्यांची शक्ती, गुंतागुंतीचा प्रश्न असला तरी तो शांतपणे समजाऊन घेऊन, त्या प्रश्नाच्या मुळाशी भिडण्याची त्यांची कुवत असामान्य होती. शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंबहुना औद्योगिकीकरणाचा बिकट प्रश्न असू द्या, तो ते शांतपणे ऐकून घेत. नंतर चौकस बुद्धीने ब गंभीरपणे प्रतिप्रश्न करीत आणि नंतर स्वतःचे मत बनवीत. एकदा मत बनविले की, ते तज्ज्ञांनासुद्धा मान्य करून पुढे जावे लागत असे. व्यवहाराची उत्तम सांगड घालणारा आणि पुस्तक न वाचताही माणूस आणि माणसाचं मन वाचणारा असा हा नेता होता. माणसांबद्दल मूलतःच प्रेम व जिव्हाळा असल्याशिवाय धोरण अमलात आणता येणार नाही. हा जिव्हाळा दादांजवळ होता. आजच्या नेत्यांच्या बाबतीत हा जिव्हाळा तपासून घ्यावा लागेल, हे वास्तव चित्र आहे.
स्वातंत्र्यानंतर कृषी-औद्योगिक समाजरचनेची उभारणी महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून करण्याचा विचार त्यांनी मांडला, यामध्ये यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा अग्रेसर व कृतिशील राहून यशस्वी ठरले. सहकारी साखर उद्योगाला खरीखुरी चालना धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता आणि विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या स्फूर्तिदायक आणि कल्पक नेतृत्वाखाली १९५० साली प्रवरा सहकारी साखर कारखाना उभारल्यानंतर मिळाली. यामुळे महाराष्ट्रात आणि देशात सहकारी साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि पुढे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि भाग्यविधाते वसंतदादा पाटील यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे राज्यातल्या ऊस उत्पादकांमध्ये सहकारी साखर कारखाने स्थापन करून संघटित करावयास प्रचंड प्रेरणा मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये साखर उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झाला. यामध्ये देशभक्त रत्नापाण्णा कुंभार, यशवंतरावजी मोहिते, तात्यासाहेब कोरे अग्रभागी होते. मात्र, उसाला किफायतशीर भाव मिळत नव्हता, तो देता येतो हे क्रांतिवीर नागनाथअण्णा यांनी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पहिल्यांदा महाराष्ट्रात आणि देशात प्रस्थापित केले आणि नंतरच्या काळात खा. राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणूनच आज ऊस उत्पादक शेतकऱ्याला किफायतशीर भाव मिळत आहे.
ऊस उत्पादकांना चार पैसे अधिक मिळवून देणारी कारखानदारी म्हणून दादांनी सहकारी साखर कारखानदारी महाराष्ट्रात वाढविण्याचा प्रयत्न केला. सहकाराच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्याला ऊस शेतीचे आधुनिकीकरण करून आपल्या पिकांचे व जमिनीचे व्यवस्थापन सक्षम पद्धतीने करता यावे आणि उसाची किंमत ठरविण्याच्या प्रक्रियेत त्याला सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे इतका व्यापक हेतू दादांचा होता. दादांना सोडून महाराष्ट्रातील साखर उद्योगाची कल्पनाच करणे अशक्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.