शिवराज्याभिषेकाच्या क्विल्ट कलाकृतीचे सांगलीत अनावरण-श्रुती दांडेकर यांचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:19 AM2019-01-18T00:19:56+5:302019-01-18T00:21:14+5:30
सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्यांच्या अथक् परिश्रमातून कापडाचे तब्बल २० हजार २८८ तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण बुधवारी
सांगली : सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्यांच्या अथक् परिश्रमातून कापडाचे तब्बल २० हजार २८८ तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण बुधवारी सांगलीत झाले.
तब्बल १९ बाय ८ फूट इतकी मोठी क्विल्ट तयार करून त्यांनी सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. शिवराज्याभिषेकाची कलाकृती भारतात प्रसिद्ध आहे. तिला जागतिक पातळीवर नेण्याचा माझा प्रयत्न आहे, असे दांडेकर यांनी सांगितले. आता ही क्विल्ट २५ ते २७ जानेवारीस चेन्नई येथे होणाऱ्या इंडिया क्विल्ट फेस्टिव्हलचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
आभाळमाया फौंडेशनच्यावतीने येथील रोटरी क्लब हॉल, गणेशनगर येथे शिवराज्याभिषेक या क्विल्टचे सादरीकरण करण्यात आले. कलाशिक्षिका भारती क्षीरसागर यांच्याहस्ते क्विल्टचे अनावरण करण्यात आले. आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, भारती विद्यापीठाचे डॉ. नितीन नायक, तानाजीराव मोरे, रोहित दांडेकर, आदि दांडेकर, अरुण दांडेकर, डॉ. जया कुºहेकर, सुमेध शहा आदी उपस्थित होते.
क्विल्ट म्हणजे आजीबार्इंच्या गोधडीचे आधुनिक रुपडे. भारतात अगदी पूर्वापार चालत आलेल्या, पण हळूहळू कालबाह्य होत चाललेल्या या कलेला गेल्या काही वर्षांत नवजीवन मिळाले आहे. अधिकाधिक स्त्रियांनी ही कला शिकावी, याकरिता श्रुती या विविध ठिकाणी प्रशिक्षण वर्ग घेतात.
शिवराज्याभिषेकाची कलाकृती ही कलाक्षेत्रातील एक मानदंड आहे. अनेक प्रकारात ही कलाकृती आपल्यासमोर आली आहे. क्विल्ट स्वरुपात ही कलाकृती तयार करण्याचा विचार बºयाच वर्षांपासून मनात होता. दहा महिन्यापूर्वी हे काम हाती घेतले. शिवरायांची महती महाराष्ट्रासह देशाला माहीत आहे. ही महती आपल्या कलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर जावी, अशी इच्छा होती. आता ही इच्छा पूर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद आहे.
- श्रुती दांडेकर, डिझायनर