आगामी निवडणुकीत यशोधन ब्रँड शिवाजी पवार गट दोन प्रभाग लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:13+5:302020-12-16T04:40:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : १९९६ मध्ये शिवाजी पवार हे आपले चुलते अशोक पवार यांचे नेतृत्व मानून शहर सुधार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : १९९६ मध्ये शिवाजी पवार हे आपले चुलते अशोक पवार यांचे नेतृत्व मानून शहर सुधार समितीच्या माध्यमातून पालिकेच्या राजकरणात सक्रिय झाले. त्यानंतर २४ वर्षाच्या कारकीर्दीत फक्त १८ महिनेच नगरसेवक राहिले. उर्वरित कालावधी फक्त न्यायालय आणि पालिका निवडणुकीत इतर उमेदवार ताकद देणे हाच त्यांचा राजकीय उद्योग बनला. त्यामुळे आगामी निवडणुकीत पवार यांनी स्थापन केलेल्या यशोधन युथ फाउंडेशनच्या माध्यमातून पालिका लढवणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.
एम. डी. पवार यांचे पुतणे आप्पासाहेब पवार हे पवार पार्टीतून दोनवेळा नगरसेवक झाले. त्यानंतर पवार घराण्याचा वारसा असलेले त्यांचे चिरंजीव शिवाजी पवार पालिकेच्या राजकारणात आले. त्यांनी यशोधन युथ फाउंडेशनच्या मध्यमातून युवा संघटना केली. याच ताकदीवर त्यांनी २०१२ च्या पालिका निवडणुकीत माघार घेऊन राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आले. यावर विरोधकांनी तीन अपत्य असल्याचे कारण देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यावेळी राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही, उलट त्यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा घेतला. आता ते यातून निर्दोष सुटले आहेत.
आगामी पालिकेत कोणत्याही गटा-तटाचे राजकारण सोडून यशोधन ब्रँडच्या नावाने दोन प्रभाग स्वबळावर लढवणार आहेत. या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रत्येकवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या युवाफळीच्या ताकदीवर आगामी पालिका निवडणुकीत शिवाजी पवार गट उतरणार आहेत.
कोट
सर्व पक्ष, शहरात असलेले गट यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. प्रभाग रचनेनंतर योग्यवेळी दोन प्रभाग स्वबळावर लढवू.
- शिवाजी पवार,
माजी नगरसेवक
फोटो -१५१२२०२०-आयएसएलएम-शिवाजी पवार