सांगली येथे अप्पर तहसिलदार कार्यालय मंजूर, 31 महसुली गावांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 02:30 PM2019-09-10T14:30:02+5:302019-09-10T14:36:19+5:30
सांगली : सांगली येथे स्वतंत्र अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्यास व त्याअनुषंगाने पद मंजुरीस व अन्य अनुषंगिक बाबीस दिनांक ...
सांगली : सांगली येथे स्वतंत्र अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्यास व त्याअनुषंगाने पद मंजुरीस व अन्य अनुषंगिक बाबीस दिनांक 9 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. अप्पर तहसिलदार सांगली यांच्या कार्यक्षेत्रात एकूण 31 महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याची वाढणारी लोकसंख्या, मोठे क्षेत्रफळ यामुळे सध्याच्या मिरज तालुक्यातील तहसील कार्यालयावर कामकाजाचा मोठा ताण पडत आहे. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सांगली येथे स्वतंत्र अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
तहसिलदार कार्यालय मिरज तसेच अप्पर तहसिलदार कार्यालय सांगली यांच्या कार्यक्षेत्रात तहसिलदार मिरज - एकूण मंडळे 7 - मिरज (5 गावे), बेडग (7 गावे), मालगाव (6 गावे), बेळंकी (10 गावे), आरग (7 गावे), भोसे (6 गावे), कवलापूर (9 गावे) अशी एकूण 50 महसुली गावे. अप्पर तहसिलदार सांगली - एकूण मंडळे 5 - सांगली (6 गावे), कुपवाड (5 गावे), कसबे डिग्रज (6 गावे), कवठेपिरान (8 गावे), बुधगाव (6 गावे) अशी एकूण 31 महसुली गावे राहतील.
विद्यमान सांगली जिल्ह्यातील मिरज तहसिल प्रशासन बळकट करण्याच्या दृष्टीने अप्पर तहसिलदार सांगली यांच्या नवीन कार्यालयासाठी अप्पर तहसिलदार 1, नायब तहसिलदार 1, अव्वल कारकून 1 लिपिक टंकलेखक 4 अशी एकूण 7 पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच सदर नवीन कार्यालयासाठी 1 वाहनचालक व 1 शिपाई यांच्या सेवा गरजेनुसार बाह्यस्त्रोताव्दारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.