सांगलीत शिक्षक बँकेच्या सभेत गदारोळ; अंडी फेकली अन् फलक फडकवले
By शीतल पाटील | Published: September 24, 2023 01:59 PM2023-09-24T13:59:13+5:302023-09-24T13:59:31+5:30
बॅँकेच्या नवीन इमारत बांधकामासह विषयपत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली.
सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत रविवारी प्रचंड गदारोळ उडाला. विरोधकांनी घोषणाबाजी करताच सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. याच गोंधळाच व्यासपीठाच्या दिशेने अंडी फेकण्यात आली. विरोधकांनी अंडी फेकल्याचा आरोप केला. यावरून दोन्ही गटात घमासान सुरु झाले. अंडी फिरकवणाऱ्याना काहींनी चोपही दिला. सत्ताधारी आक्रमक होताच विरोधकांनी सभागृह सोडले. यानंतर सभेचे कामकाज शांततेत पार पडले. बॅँकेच्या नवीन इमारत बांधकामासह विषयपत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली.
शिक्षक सहकारी बँकेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या सभागृहात पार पडली. बॅँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे अध्यक्षस्थानी होते. बँकेच्या नवीन इमारत बांधकामावरून आरोप- प्रत्यारोप सुरु होते. त्याचे पडसाद सभेत उमटले. सत्ताधाऱ्याच्या तुलनेत विरोधी बँक बचाव कृती समितीचे संख्याबळ नगण्य होते. विरोधकांनी मागून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. त्याला सत्ताधारी स्वाभिमानी आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या कारभाराचे फलक दाखविले.
अध्यक्ष विनायक शिंदे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचनास सुरुवात करताच गोंधळ, घोषणाबाजी वाढली. दोन अंडी व्यासपीठाच्या दिशेने फिरकवण्यात आली. यातील एक अंडे महिला सभासदांमध्ये जाऊन पडले. यामुळे संतप्त सत्ताधारी सभासदांनी विरोधकांना जाब विचारत शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याचा आरोप केला. अखेर विरोधकांनी घोषणा देत सभागृह सोडले. यानंतर सर्व विषयांना बहुमताने टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. आभार उपाध्यक्ष अनिता काटे यांनी मानले.