नगरविकासमंत्री शिंदे शनिवारी महापालिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:48+5:302021-01-08T05:25:48+5:30
सांगली : जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यादिवशी सकाळी ...
सांगली : जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यादिवशी सकाळी साडेदहा वाजता महापालिकेत आढावा बैठक होणार आहे. यावेळी नवीन बांधकाम नियमावलीच्या सादरीकरणासह रखडलेल्या प्रकल्पांबाबत चर्चा होणार आहे.
महापालिकेच्या कारभाराबाबत गेल्या काही दिवसात विरोधी पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांकडून शासनाकडे तसेच नगरविकास मंत्र्यांकडे अनेक तक्रारी झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी होणारा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री जयंत पाटील, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महापालिकेत सकाळी साडेदहा वाजता आढावा बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. विविध प्रकल्पांची माहिती संकलित केली जात आहे. शासनाने नवीन जाहीर केलेल्या बांधकाम नियमावलीचे सादरीकरण होणार आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या योजना, त्यांची प्रगती व त्यातील अडचणींबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
चौकट
झाडाझडतीची शक्यता
महापालिकेच्या कारभाराबाबत मंत्रालय स्तरावर अनेक तक्रारी झाल्या आहेत. त्यात विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे या बैठकीत अधिकाऱ्यांची मंत्र्यांकडून झाडाझडती होण्याची शक्यता आहे.