घाटकोपर दुर्घटनेनंतर सांगलीतील होर्डिंगचे तातडीने ऑडिट, महापालिका आयुक्तांकडून आदेश

By अविनाश कोळी | Published: May 14, 2024 04:14 PM2024-05-14T16:14:01+5:302024-05-14T16:17:04+5:30

अनधिकृत होर्डिंग हटणार  

Urgent audit of hoardings in Sangli after Ghatkopar tragedy | घाटकोपर दुर्घटनेनंतर सांगलीतील होर्डिंगचे तातडीने ऑडिट, महापालिका आयुक्तांकडून आदेश

घाटकोपर दुर्घटनेनंतर सांगलीतील होर्डिंगचे तातडीने ऑडिट, महापालिका आयुक्तांकडून आदेश

सांगली : मुंबईच्या घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत चौदाजणांचा बळी गेल्यानंर सांगली, मिरज व कुपवाड शहरातील होर्डिंगच्या ऑडिटला सुरुवात झाली आहे. महापालिका क्षेत्रातील एकूण २९७ होर्डिंग कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश ठेकेदाराला तसेच महापालिकेच्या मालमत्ता विभागाला देण्यात आले आहेत. महापालिकेमार्फत अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याच्या कारवाईलाही सुरुवात झाली आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी होर्डिंगबाबत मंगळवारी मालमत्ता विभागाला शोधमोहिमेचे आदेश दिले. तिन्ही शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे. होर्डिंग ठेकेदाराला सर्व फलकांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वादळी वाऱ्याने होर्डिंग कोसळण्याचे प्रकार यापूर्वी सांगलीत अनेकदा घडले आहेत. मात्र, त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. भविष्यात कोणतीही दुर्घटना या माध्यमातून होऊ नये, यासाठी महापालिकेने सतर्कता बाळगली आहे.

सांगलीत पाया दहा फुटांपर्यंत

मक्तेदार रावसाहेब मोरे यांनी सांगितले की, सांगलीत मोठ्या होर्डिंगचा पाया दहा फुटांपर्यंत खोदून भक्कम करण्यात येतो. महापालिका क्षेत्रातील सर्वच होर्डिंगच्या पायाभरणीची पाहणी महापालिकेच्या अभियंत्यांनी करुन नंतर नाहरकत दिली आहे. तरीही चाैक व मुख्य रस्त्यांवरील होर्डिंगच्या पाया व सांगाड्याची आम्ही पुन्हा तपासणी करीत आहोत, असे मोरे यांनी सांगितले.

चालू वर्षाचे ऑडिट पूर्ण

सांगली, मिरज, कुपवाड या शहरांमधील होर्डिंगचे चालू वर्षाचे ऑडिट अहवाल सादर झाल्याची माहिती मालमत्ता व्यवस्थापकांनी दिले. तरीही आता दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. ठेकेदारानेही स्वतंत्रपणे तपासणी सुरु केली आहे.

मक्तेदार संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट होणार असले तरी त्रयस्थपणेही होर्डिंगची तपासणी केली जाईल. धोकादायक व अनधिकृत होर्डिंग हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तातडीने शोधमोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. - शुभम गुप्ता, आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका

Web Title: Urgent audit of hoardings in Sangli after Ghatkopar tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली