उटगी तालुका करण्याची मागणी

By admin | Published: January 6, 2015 12:12 AM2015-01-06T00:12:33+5:302015-01-06T00:45:54+5:30

जत तालुका विभाजन ऐरणीवर : महसूलमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार, ठोस कृतीची अपेक्षा

Urgent demand for taluka | उटगी तालुका करण्याची मागणी

उटगी तालुका करण्याची मागणी

Next

उटगी : जत तालुक्याचे विभाजन करून नवीन उटगी तालुका करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली असून, लवकरच एक शिष्टमंडळ महसूलमंत्र्यांना भेटणार आहे. नवीन सरकारकडे तालुका विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्याचे एकूण भौगोलिक जमीन क्षेत्रात सर्वात मोठे जमीन क्षेत्र जत तालुक्याचे आहे. एकूण जमीन क्षेत्राच्या ७४ टक्के जमीन क्षेत्र ९ तालुक्यात व्यापले असून, एकट्या जत तालुक्याचे जमीन क्षेत्र २६ टक्के आहे. उटगी हे गाव जत संस्थानची उपराजधानी म्हणून ओळखली जाते. १९८५ मध्ये मुंबई प्रांत सरकार यांनी जत तालुक्याचे विभाजन करून उटगी तालुका निर्माण करण्याचे ठरले होते. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी नियोजित पंढरपूर जिल्ह्यात उटगीचा समावेश करुन नवीन उटगी तालुका होण्यासंदर्भात अनुकूलता दर्शविली होती. १९५० मध्ये मंगळवेढा तालुका निर्माण करतेवेळी जत तालुक्यातील २७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी २१ गावांचा नियोजित उटगी तालुक्यास जोडल्यास उटगी हे गाव मध्यवर्ती ठिकाण बनणार असून, मंगळवेढा आणि जत तालुक्यातील लांबच्या गावांना न्याय मिळाल्यासारखे होईल.
अलीकडे सांगली जिल्ह्यात पलूस व कडेगाव दोन तालुके निर्माण झाले आहेत. या तालुक्यांपेक्षा जत तालुका जमीन क्षेत्रामध्ये ५ पट, लोकसंख्येमध्ये दीड-दोन पट व गाव संख्यामध्ये अडीच ते चार अधिक आहेत. जत तालुका विस्ताराने मोठा असून, जतपासून शेवटचे गाव ६० ते ७० किमी अंतरावर आहे.
जत तालुक्यातील ५७ गावे व मंगळवेढा तालुक्यातील २१ गावे असे मिळून उटगी तालुक्यात ७८ गावांचा समावेश होणार आहे, तर मंगळवेढा तालुक्यात ६१ गावे राहणार असून, जत तालुक्यात ६८ गावे येणार आहे. उटगी हे गाव जत, चडचण, सोलापूर राज्य मार्गावर आहे. विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्यातील शेवटच्या टोकावरील सोनलगी, कोंतेवबोबलाद, गिरगाव आदी गावे कर्नाटक सीमेवर आहेत. महसुली कामे, शैक्षणिक व शासकीय कामांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी या गावांना जतला यावे लागते. ते अंतर ६० किमीपेक्षा जादा आहे. स्वतंत्र उटगी तालुका निर्माण केल्यास मंगळवेढा तालुक्यातील काही गावे व जत तालुक्याच्या सीमेवरील गावातील लोकांना सोयीचे होणार आहे.
उटगी तालुका निर्माण कृती समितीचे तत्कालीन अध्यक्ष संगप्पा काराजनगी, उपाध्यक्ष रामचंद्र माने, सचिव जीवराज पवार यांनी ८ वर्षापूर्वी प्रस्ताव दिल्याचे समजते. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गतवर्षी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
आघाडी सरकार जाऊन आता भाजप सरकार सत्तेवर आले आहे. नवीन सरकारकडून जत तालुक्याचे विभाजन करून नवीन उटगी तालुका निर्माण करावा, अशी मागणी पूर्व भाग गावातील लोकांकडून होत आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून जत तालुक्याचे विभाजन रखडले असून, नवीन सरकारकडून यासंदर्भात ठोस भूमिकेची अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

उटगी तालुक्यातील प्रस्तावित गावे
जत तालुका : उटगी, लकडेवाडी, जाडरबोबलाद, आबाचीवाडी, सोन्याळ, राजोबावाडी, माडग्याळ, कुणीकोणूर, व्हसपेठ, कुलाळवाडी, अंकलगी, बोर्गी बु।।, संख, आकळवाडी, बोर्गी (खु), माणिकनाळ, गिरगाव, लवंगी, गुलगुंजनाळ, गोंधळेवाडी, भिवर्गी, मोरबगी, दरीबडची, लमाणतांडा, खंडनाळ, पांडोझरी, करेवाडी, तिकोंडी, जालिहाळ बु., सिद्धनाथ, ज्याल्याळ खु., पांढरेवाडी, मोटेवाडी, आसंगी (तु.), धुळकरवाडी, कागनरी, करेवाडी (को), कोंतेवबोबलाद, कोणबगी, आसंगी (जत), मोटेवाडी, गुड्डापूर, सोरडी, तिल्याळ, दरिकोणूर, लमाणतांडा (उटगी), निगडी बु., उमदी, विठ्ठलवाडी, सोनलगी, सुसलाद, हळ्ळी, बालगाव, बेळुंडगी.

Web Title: Urgent demand for taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.