..अखेर तिने ‘पीएसआय’चे स्वप्न केलं साकार, सांगलीच्या उर्मिला खोत यांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 07:20 PM2022-06-18T19:20:44+5:302022-06-18T19:27:10+5:30
मुलीच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार झाल्याचा आनंद उर्मिलाच्या आई-वडिलांना झाला. दीक्षांत समारंभात त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते.
सांगली : वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सांगलीच्या महिला कॉन्स्टेबलने प्रयत्नांची पाराकाष्टा केली. चार वेळा अपयश येऊनही पाचव्यांदा पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान त्यांना मिळाला. केवळ हे पदच नव्हे तर प्रशिक्षणादरम्यान त्यांनी दोन पुरस्कार मिळवून राज्यभरातून आलेल्या महिलांमध्ये अव्वल कामगिरी करुन दाखविली.
सांगलीच्या उर्मिला महेश कांबळे (भोई) म्हणजेच पूर्वाश्रमीच्या उर्मिला जालिंदर खोत या २००३ मध्ये सांगली पोलीस दलात रुजू झाल्या होत्या. २००४ मध्ये त्यांचा विवाह जिम प्रशिक्षक महेश कांबळे यांच्याशी झाला. उर्मिला यांचे वडिल काही काळ लष्करात व त्यानंतर पोलीस दलात होते. आजोबाही लष्करात हाेते. आपल्या मुलीने कर्मचारी नव्हे तर पोलीस अधिकारी व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती.
त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी उर्मिला यांनी २०११ पासून खात्यांतर्गत परीक्षा देण्यास सुरुवात केली. बाहेरुनही त्यांनी परीक्षा दिली, मात्र त्याठिकाणी थोडक्यात यशाने हुलकावणी दिली. चार परिक्षांमध्ये अपयश आल्यानंतरही त्यांनी जिद्द सोडली नाही. खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील अनेक कर्मचाऱ्यांबरोबर त्यांचेही स्वप्न न्यायिक प्रक्रियेत अडकले. अखेर जेव्हा हा वाद मिटला तेव्हा त्यांचे नाव यादीत आले आणि त्यांना प्रशिक्षणासाठी नाशिकला निमंत्रित करण्यात आले.
बेस्ट ऑल राऊंडर वुमन कॅडेट इन द बॅच’चा किताब
नऊ महिन्यांच्या मैदानी, लेखी परीक्षेसह फायरिंगमध्ये त्यांनी महिलांत अव्वल स्थान पटकावले. याठिकाणी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार तसेच बेस्ट ऑल राऊंडर वुमन कॅडेट इन द बॅच’चा किताब मिळाला. नाशिकमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीत त्यांनी पोलीस मुख्यालयातील विविध शाखा, मिरज शहर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग याठिकाणी १८ वर्षे नाेकरी केली आहे. उर्मिला यांनी सांगितले की, माझ्या यशात आई-वडिलांसह पती व मुलगीचेही योगदान आहे.
आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू
मुलीच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार झाल्याचा आनंद उर्मिलाच्या आई-वडिलांना झाला. दीक्षांत समारंभात त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते.