वापरा आणि टाकून द्या संस्कृती पर्यावरणासाठी घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:45+5:302021-05-26T04:26:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : मानवाची बदलती जीवनशैली आणि अतिग्राहकता यामुळे पृथ्वीची धारण क्षमता कमी होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: मानवाची बदलती जीवनशैली आणि अतिग्राहकता यामुळे पृथ्वीची धारण क्षमता कमी होत आहे. अतिग्राहकतेतून आलेली वापरा आणि टाकून द्या संस्कृती पर्यावरणासाठी घातक आहे, असे प्रतिपादन सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. स्मिता जांभळी यांनी केले.
पर्यावरण समृद्धी मंच शिराळा- वाळवा आयोजित ‘पर्यावरणतज्ज्ञ आपल्या भेटीला’ या ऑनलाईन उपक्रमात ‘पर्यावरण समस्या आणि शाश्वत विकास’ या विषयावर त्या बोलत होत्या. नंदुरबार येथील पर्यावरणतज्ज्ञ प्राचार्य एच. एम. पाटील प्रमुख पाहुणे होते.
प्रा. जांभळी म्हणाल्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचे असमान वितरण, बदलती जीवनशैली आणि अतिग्राहकता त्यामुळे पृथ्वीची धारण शक्ती कमी होत आहे. वापरा आणि टाकून द्या, या संस्कृतीमुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे आपले जगणे पर्यावरणपूरक असायला पाहिजे. आपल्या गरजा भागवत असताना पुढील पिढीसाठी नैसर्गिक संसाधने शिल्लक राहणार नसतील, तर आपल्याला शाश्वत विकासाचा मार्ग पत्करावा लागेल.
प्राचार्य पाटील म्हणाले, आपले गाव, गावातील चांगली माणसे यांनी एकत्रित येऊन स्थानिक पातळीवरील कृती कार्यक्रम करणे आवश्यक आहे.
प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जितेंद्र लोकरे यांनी केले.
या वेबिनारला मोहन परजने, प्रदीप कुडाळकर, गोदावरी क्षीरसागर, संदीप चोडणकर, सोनाली शिंदे, प्रमोदिनी पाटील उपस्थित होते.