पालिका कर्मचाऱ्याकडून खोट्या ओळखपत्राचा वापर
By admin | Published: July 3, 2016 12:26 AM2016-07-03T00:26:59+5:302016-07-03T00:26:59+5:30
आयुक्तांकडे तक्रार : कारवाई होणार
सांगली : महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांचा प्रभारी कार्यभार मिळालेले स्वच्छता कर्मचारी श्रीकांत वळसे यांनी खोटे ओळखपत्र तयार केले असून, त्यांच्यावर आयुक्तांनी फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते संभाजी सावंत यांनी केली आहे.
सावंत यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वळसे हे सफाई कामगार आहेत. तरीही त्यांनी स्वच्छता निरीक्षक असे पद असलेले ओळखपत्र बाळगले आहे. ओळखपत्रावर आयुक्त, उपायुक्त यांच्या स्वाक्षऱ्या असतात. मात्र संबंधित कर्मचाऱ्याच्या ओळखपत्रावर नेमकी स्वाक्षरी कोणाची आहे, याची चौकशी करावी. ज्यांनी स्वाक्षरी केली असेल, त्यांच्यावरही कारवाई व्हावी. कोणत्याही प्रभारी पदाचा कार्यभार हा काही कालावधिसाठी असतो. अशा प्रभारीपदाच्या कार्यकाळात मूळ पदाचेचे ओळखपत्र बाळगणे आवश्यक असताना, वळसे यांनी प्रभारी पदाच्या नावे ओळखपत्र तयार करून घेतले आहे.
आयुक्तांनी याबाबत सखोल चौकशी करून कर्मचाऱ्यासह संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनाबरोबर संबंधित कर्मचाऱ्याच्या ओळखपत्राची सत्यप्रतही संभाजी सावंत यांनी सादर केली आहे. (प्रतिनिधी)