बोरगावच्या आरोग्य केंद्रात सदोष उपकरणांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:35+5:302021-04-24T04:27:35+5:30

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असतानाच, ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे रुग्णांची फरफट होऊ लागली आहे. अशा संकटाच्या ...

Use of faulty equipment in Borgaon health center | बोरगावच्या आरोग्य केंद्रात सदोष उपकरणांचा वापर

बोरगावच्या आरोग्य केंद्रात सदोष उपकरणांचा वापर

googlenewsNext

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असतानाच, ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे रुग्णांची फरफट होऊ लागली आहे. अशा संकटाच्या काळात बोरगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका सदोष उपकरणांचा वापर करत चुकीची माहिती देत असल्याने रुग्ण व नातेवाईक धास्तावत आहेत.

बोरगाव येथे कोरोनाचे अनेक रुग्ण आहेत. काहींचा बळी गेला आहे. त्यांच्या संपर्कात आलेले कुटुंबीयही कोरोनाने ग्रासले आहेत. त्यातील काही रुग्ण घरीच विलगीकरणात राहिले आहेत. या सर्वांची दैनंदिन तपासणी बोरगाव आरोग्य केंद्राच्या यंत्रणेकडून केली जाते. गुरुवारी दुपारी एका कॉलनीतील महिलेची तपासणी करण्यासाठी परिचारिका आल्या होत्या. संबंधित महिला कोरोनाबाधित असल्याने परिचारिकांनी दोन ऑक्सिमीटरच्या साहाय्याने त्यांची ऑक्सिजन पातळी तपासली. त्यानंतर काही वेळ या रुग्णाला चालवून पुन्हा ऑक्सिजन पातळी तपासली. त्यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांना बाजूला बोलावून रुग्णाची ऑक्सिजन पातळी खालावली असून, तातडीने ऑक्सिजन बेड उपलब्ध असतील, तिथे त्यांना तातडीने दाखल करा, असा सल्ला देऊन या परिचारिका निघून गेल्या.

कोरोनाबाधित महिलेची तब्बल २४ तासांनी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ऑक्सिजन पातळी तपासण्यात आल्यावर ती ९४ असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे गुरुवारी परिचारिकांनी आणलेले यंत्र सदोष असल्याचे सिद्ध झाले. ऑक्सिजन पातळी ८५-८६ पर्यंत खालावली असेल, तर असा रुग्ण एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. मात्र संबंधित महिला रुग्णालयात जाताना १०० मीटर अंतर चालत येऊन वाहनामध्ये बसली होती. त्यांना दम, धाप अथवा श्वासोच्छवासामध्ये अडथळा जाणवला नाही. परिचारिकांमुळे संबंधित रुग्णाचे कुटुंब काही काळ तणावग्रस्त झाले होते.

कोट

गुरुवारी तपासणीसाठी आलेल्या परिचारिकांनी माझ्या आईची ऑक्सिजन पातळी ८५-८६ इतकी खालावलेली असून ताबडतोब उपचारासाठी हलवा, असे सांगितले. मात्र शुक्रवारी तपासल्यानंतर ती ९४ असल्याचे स्पष्ट झाले. बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बेजबाबदार वर्तनाची चौकशी झाली पाहिजे.

- संबंधित महिला रुग्णाचा मुलगा, बोरगाव

Web Title: Use of faulty equipment in Borgaon health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.