सोने तस्करीसाठी मराठी तरुणांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:12+5:302021-02-05T07:19:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायासाठी हजारो मैल दूर गेलेल्या महाराष्ट्रातील विशेषत: सांगली जिल्ह्याच्या खानापूर, आटपाडी व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायासाठी हजारो मैल दूर गेलेल्या महाराष्ट्रातील विशेषत: सांगली जिल्ह्याच्या खानापूर, आटपाडी व तासगाव तालुक्यातील तरुणांना १५ ते २० हजार रुपयांचे आमिष दाखवून त्यांचा आंतरराष्ट्रीय व परप्रांतीय तस्करांकडून सोने तस्करीसाठी सर्रास वापर सुरू आहे.
याबाबत खात्रीलायक वृत्त असून सिलीगुडी तसेच नेपाळच्या सीमेपासून होणाऱ्या सोने तस्करीप्रकरणी आतापर्यंत कारवाई केलेल्या मराठी तरुणांची संख्या ४० हून अधिक असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात येऊ लागला आहे. त्यामुळे परप्रांतीय सोने तस्करांमुळे आणि झटपट श्रीमंत बनण्याच्या आमिषाने मराठी तरुण अडचणीत येऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगावसह अन्य तालुक्यांतील अनेक तरुण सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त परप्रांतात स्थायिक झाले आहेत. परंतु, लॉकडाऊन आणि व्यवसायातील मंदीमुळे काही मराठी तरुण सोने तस्करीकडे वळल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात दिल्ली येथील केंद्रीय गुप्तचर संचनालयाच्या अधिकाऱ्यांनी तस्करीतील ८३ किलो सोने जप्त केले होते. त्या सोने तस्करीचे कनेक्शन खानापूर व आटपाडी तालुक्यापर्यंत पोहोचले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे काम सुरू आजही सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच गेल्या गुरुवारी दिल्ली व लखनौ येथील गुप्तचर संचनालयाने (डीआरआय) सुमारे २५ कोटी रुपयांचे ५५ किलो ६१ ग्रॅम वजनाचे सोने पकडले. या तस्करीतील आठ जणांपैकी चौघे जण खानापूर व आटपाडी तालुक्यातील असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, सोने तस्करीत सापडलेल्या तरुणांची संख्या सुमारे ४० पेक्षा जास्त आहे. हे अत्यंत चिंताजनक असल्याची चर्चा सुरू आहे.
फोटो - २७०१२०२१-विटा-गोल्ड : दिल्ली व लखनौ येथे डीआरआयच्या पथकाने छापा टाकून सुमारे ५५ किलो सोने जप्त केले. या जप्त केलेल्या तस्करीतील सोन्याची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पाहणी केली.