Sangli: शेतीच्या युरियाचा इंडस्ट्रीजसाठी वापर, कडेगावमध्ये ३८ लाखांचा युरिया जप्त
By अशोक डोंबाळे | Published: March 23, 2024 06:30 PM2024-03-23T18:30:13+5:302024-03-23T18:31:57+5:30
कृषी विभागाकडून बोगसगिरीचा भांडाफोड
सांगली : शेती वापरासाठीचा युरिया इंडस्ट्रीज वापरासाठीच्या बॅगमध्ये भरून काळाबाजार करणाऱ्याचा कृषी विभागाच्या पथकाने शुक्रवारी कडेगावमध्ये भांडाफोड केला. संबंधीतांकडून शेती वापराचा २१० टन युरिया जप्त केला आहे. या युरियाची ३७ लाख ८९ हजार ७७९ रुपये किंमत असून गोदाम व्यवस्थापक शंकर जगन्नाथ काळे (वय ५३, रा. आटके, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांच्याविरोधात कडेगाव पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
कडेगाव एमआयडीसीमधील प्लॉट नंबर ए ३८ मध्ये पत्र्याच्या शेडमध्ये खत नियंत्रण निरीक्षक राहुल बिरनाळे, कडेगावचे तालुका कृषी अधिकारी बुकेश्वर प्रकाश घोडगे, पोलिस उपनिरीक्षक यू. आर. काळे यांनी शुक्रवारी छापा टाकून तपासणी केली. यावेळी शेती वापरासाठीच्या युरियाचा साठा गोदामात आढळून आला. आर. सी. एफ, सरदार, मद्रास फर्टीलायझर, इफकोई कंपनींच्या युरियाच्या बॅगा सापडल्या आहेत. इंडस्ट्रीज वापरासाठीच्या ५० किलोच्या एक हजार ३५० बॅगा आढळून आल्या आहेत. तसेच गोदामाच्या समोर उभा असणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच०४, जीआर ३००४ मध्ये ५० किलोच्या ४०० बॅगा आढळून आल्या आहेत.
यामध्येही आर.सी.एफ, जीएसएफसी, मद्रास फर्टीलायझर, जयकिसान, इफ्को, कृपको आदी कंपन्यांच्या युरियाच्या बॅगांचा समावेश आहे. गोदामामध्ये शेती वापरासाठीच्या दोन हजार ७२९ मोकळ्या बॅगा आढळून आल्या आहेत. या बॅगांवर इंडस्ट्रीज वापरासाठीचा युरिया असा शिक्का आहे. कृषी वापरासाठी असणाऱ्या साठ्यातून तपासणीसाठी चार कंपन्यांचे पॅशदिप फॉस्फेट, जीएसएफसी, मद्रास फर्टीलायझर, आरसीएफ या कंपन्यांच्या खताचे नमुने घेतले आहेत.
टेक्निकल ग्रेड युरिया केवळ इंडस्ट्रीजसाठी असतो. या युरियाच्या सीलबंद पोत्यातून तीन नुमने तपासणीसाठी घेतले आहेत. या खताचे सर्व नुमने तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय प्रयोग शाळेकडे पाठविले आहेत. या सर्व युरियाची किंमत ३७ लाख ८९ हजार ७७९ रुपये आहे. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक शंकर जगन्नाथ काळे (वय ५३, रा. आटके, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांच्याविरोधात कडेगाव पोलिसांमध्ये कृषी विभागाने शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.