बोलवाड आरोग्य केंद्रात कालबाह्य औषधांचा वापर
By admin | Published: November 5, 2014 09:46 PM2014-11-05T21:46:29+5:302014-11-05T23:43:48+5:30
साठा ताब्यात : सभापतीकडून कारवाई
टाकळी : बोलवाड (ता. मिरज) येथील आरोग्य उपकेंद्रात कालबाह्य झालेली चार प्रकारची औषधे वापरत असल्याचे आढळल्याने मिरज पंचायत समितीच्या सभापतींसह सदस्यांनी कालबाह्य औषधांचा साठा ताब्यात घेतला.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रांमधील आरोग्य उपचाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्याने मिरज पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे व सदस्यांनी आरोग्य केंद्रांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. या भेटीदरम्यान रुग्णांची नोंदवही, प्रसुती उपचार केले जातात का, यासह इतर उपचारांबरोबर कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी वास्तव्यास असतात का याची माहिती घेतली जात आहे.
मालगाव येथील डेग्यू साथीची माहिती घेऊन सभापती दिलीप बुरसे, विरोधी पक्षनेते अरुण राजमाने, सदस्य सतीश निळकंठ यांनी बोलवाड उपकेंद्रास भेट दिली. त्यांनी उपकेंद्राच्या कारभाराची चौकशी करताना रुग्णांना उपचारासाठी व वापरात असणाऱ्या औषधांमध्ये २०१३ ची व्हिटॅमिनसह चार प्रकारची कालबाह्य झालेली औषधे आढळून आली. कालबाह्य औषधे नष्ट न करता ती वापरत असलेल्या साठ्यात सापडल्याने पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे व सदस्यांनी ताब्यात घेऊन तालुका वैद्यकीय कार्यालयातील आरोग्य विस्तार अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन चौकशी करण्याची व कारवाईचे आदेश दिले. मिरज तालुक्यातील आरोग्य केंद्रांना पंचायत समितीचे पदाधिकारी भेटी देऊ लागल्याने तेथील गैरकारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. या भेटीने आरोग्य कर्मचाऱ्यांतही खळबळ माजली आहे. (वार्ताहर)
आरोग्य सेविका मोहिमेवर
बोलवाड उपकेंद्रास सभापती व सदस्यांनी भेट दिली असता, तेथील कारभार सांभाळणाऱ्या आरोग्य सेविका या मालगाव येथील साथीच्या सर्वेक्षण मोहिमेत सहभागी असल्याने पदाधिकाऱ्यांना जाब विचारता आला नाही. कालबाह्य औषधे ताब्यात घेऊन तालुका आरोग्य विस्तार अधिकाऱ्यांकडे देण्यात आली.