कत्तलखान्याचा वापर व्यापारी कारणांसाठी

By admin | Published: June 12, 2017 11:48 PM2017-06-12T23:48:20+5:302017-06-12T23:48:20+5:30

कत्तलखान्याचा वापर व्यापारी कारणांसाठी

Use of slaughterhouse for business purposes | कत्तलखान्याचा वापर व्यापारी कारणांसाठी

कत्तलखान्याचा वापर व्यापारी कारणांसाठी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या कत्तलखान्याचा खासगी ठेकेदाराच्या मांस निर्यातीच्या व्यवसायासाठी वापर सुरु आहे. ठेकेदाराच्या कारभारामुळे चर्चेत असलेल्या कत्तलखान्याची पाहणी करून कारवाई करणार असल्याचे प्रभाग समिती सभापती शुभांगी देवमाने यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रातील मोठ्या जनावरांच्या कतलीसाठी मिरजेत बेडग रस्त्यावर सुमारे तीन कोटी रुपये खर्चून कत्तलखान्याची उभारणी करण्यात आली आहे. हा कत्तलखाना चालविण्यासाठी मुंबईच्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हा ठेकेदार उपठेकेदारामार्फत हा कत्तलखाना चालवित आहे. महापालिकेने केलेल्या करारातील अटींचे कत्तलखान्यात उल्लंघन सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
जिल्ह्यातील व स्थानिक जनावरे कापण्यासाठी कत्तलखान्याची उभारणी करण्यात आली असताना, कर्नाटकातील जनावरे आणून मोठ्या शहरात मांस निर्यात करण्याचा उद्योग सुरु आहे. स्थानिक मांस विक्रेते शहरापासून दूर असलेल्या कत्तलखान्याकडे जात नसल्याने परजिल्ह्यातील जनावरे कापून मांस निर्यातीच्या व्यवसायासाठी महापालिकेच्या कत्तलखान्याचा वापर सुरु आहे. कापण्यात येणाऱ्या जनावरांची वैद्यकीय तपासणी न करता, पशुवैद्यक तज्ज्ञाच्या अनुपस्थितीत जनावरांची कत्तल करुन आर्थिक फायद्यासाठी रात्रंदिवस कत्तलखाना चालविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. जनावरांची आतडी व अन्य टाकाऊ अवयवांची विल्हेवाट लावण्याऐवजी ते आजुबाजूच्या परिसरात टाकण्यात येत असल्याने मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सुरु आहे. ठेकेदाराशी कराराप्रमाणे कत्तलखान्याच्या नूतनीकरणाचे काम अपूर्ण आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमांच्या उल्लंघनाबद्दल कत्तलखान्याला टाळे ठोकले होते. मात्र त्यानंतरही कत्तलखान्याचा कारभार सुधारलेला नाही. काही नगरसेवक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे ठेकेदाराकडून कत्तलखान्याचा व्यापारीकरणासाठी वापर सुरुच आहे. कत्तलखान्यात जनावरांच्या चरबीपासून तेल तयार करण्याचा व हाडांवर प्रक्रिया करण्याचा विनापरवाना उद्योग सुरु आहे. महापालिका प्रभाग समिती सभेत कत्तलखान्याच्या ठेकेदाराच्या नियमबाह्य कारभाराबाबत शुभांगी देवमाने यांनी कत्तलखान्याची पाहणी करुन तेथील गैरप्रकार बंद करणार असल्याचे सांगितले.
ठेकेदाराची न्यायालयात धाव
यापूर्वीचा ठेका रद्द करण्यात आल्याने ठेकेदाराने ४८ कोटी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. कत्तलखान्याचे अर्थकारण मोठे असल्याने कारभारी नगरसेवकांच्या मर्जीतील ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येते. प्रभाग समिती सभेत कत्तलखान्यात निर्बंध असलेल्या जनावरांचीही कत्तल होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
कुत्र्यांचा मोठा उपद्रव
कत्तलखान्यातील टाकाऊ कचऱ्यामुळे परिसरातील गावांना कुत्र्यांचा मोठा उपद्रव होत आहे. पाच वर्षापूर्वी मोकाट कुत्र्यांनी टाकळीतील एका बालिकेवर हल्ला करुन तिचा बळी घेतला. मात्र त्यानंतरही कत्तलखान्यातील जनावरांच्या टाकाऊ अवयवांच्या विल्हेवाटीबाबत काहीच उपाययोजना झालेली नाही.

Web Title: Use of slaughterhouse for business purposes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.