जेवण इतके आवडले की, खानसाम्याला दिली 'इतकी' बक्षिशी!, सांगलीकरांनी अनुभवली झाकीर हुसेन यांची दिलदारी

By संतोष भिसे | Updated: December 17, 2024 16:37 IST2024-12-17T16:32:58+5:302024-12-17T16:37:59+5:30

मिरजेत बनवलेला तबला ३१ वर्षे वाजवला

Ustad Zakir Hussain played tabla made in Miraj for 31 years | जेवण इतके आवडले की, खानसाम्याला दिली 'इतकी' बक्षिशी!, सांगलीकरांनी अनुभवली झाकीर हुसेन यांची दिलदारी

जेवण इतके आवडले की, खानसाम्याला दिली 'इतकी' बक्षिशी!, सांगलीकरांनी अनुभवली झाकीर हुसेन यांची दिलदारी

संतोष भिसे

सांगली : सांगलीत अबकड कल्चरल ग्रुपच्या संगीत महोत्सवासाठी आलेल्या उस्ताद झाकीर हुसेन यांच्या आठवणींचा दरवळ ३१ वर्षांनंतरही रसिकांच्या मनामनांत दरवळतो आहे. नव्वदीच्या दशकात ते संगीतनगरी मिरजेत आणि नाट्यपंढरी सांगलीत आले होते. दिलदार स्वभावाने त्यांनी रसिकांची मने जिंकली होती.

सांगली, मिरजेत संगीत महोत्सवानिमित्त देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली असली, तरी तबलानवाज झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाचा स्वर्गीय आनंद मिळविण्याची संधी फारशी आली नाही. लाख-दीड लाख रुपयांची बिदागी घेणाऱ्या कलावंतांचे कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे त्याकाळी संयोजकांसाठी मोठेच आर्थिक आव्हान असायचे. १९९४ मध्ये सांगलीतील अबकड कल्चरल ग्रुपच्या तिसऱ्या संगीत महोत्सवासाठी त्यांना आमंत्रित करण्याचे धाडस जयंत पाटील, शरद मगदूम आदींनी केले. 

अवघ्या १० हजारांत कार्यक्रम ठरला. त्यांच्यासोबत त्यांचे वडील अल्लारखांसाहेब होते. ते माझे वडील असले, तरी गुरुदेखील आहेत, त्यामुळे त्यांची बिदागी माझ्याहून मोठी असावी, अशी अट त्यांनी घातली. खांसाहेबांची बिदागी २१ हजार रुपये ठरली. अवघ्या ३१ हजारांत दोन दिग्गज कलाकार म्हणजे संयोजकांसाठी देव देतो दोन डोळे..अशीच अवस्था होती. पहाटे अडीचपर्यंत मैफल रंगली. सांगलीकरांनी त्यांचे स्वर्गीय तबलावादन कानात प्राण एकवटून ऐकले.

सांगलीतून डबा मुंबईला नेला

पहाटे तीन वाजता शासकीय विश्रामगृहात जेवण केले. मेन्यू इतका आवडला की शिल्लक जेवणाचा डबा मुंबईत बहिणीला नेऊन दिला. जेवणाची थाळी १५० रुपयांची असल्याचे खानसामा लाड यांनी सांगितल्यावर तर ते आश्चर्यचकितच झाले. त्यांना १००० रुपयांची बक्षिशी दिली.

मिरजेत बनवलेला तबला ३१ वर्षे वाजवला

या कार्यक्रमात हुसेन यांना तबल्याची छोटी प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली होती. ती मिरजेतील विजय व्हटकर यांनी तयार केली होती. हीच भेट व्हटकर कुटुंबीयांना मुंबईत तबला निर्मिती व्यवसायासाठी प्रेरक ठरली. व्हटकर यांनी बनविलेला तबला उस्तादांनी तब्बल ३१ वर्षे वाजवला. २०१२ मध्ये मिरजेत व्हटकर यांच्या घरी भेट दिली. मिरजेतील हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब दर्ग्यावरही त्यांची नितांत श्रद्धा होती. तेथील सतारमेकरांशी त्यांचे अतूट नाते होते, असे बाळासाहेब मिरजकर म्हणाले.

Web Title: Ustad Zakir Hussain played tabla made in Miraj for 31 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.